रेश्मा राईकवार

कलंक

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठा काळ असा होता जेव्हा जत्रेत किंवा मेळ्यात हरवलेले दोन भाऊ, खूप वर्षांनी असंख्य योगायोग घडून भेटत. मोठमोठे नायकिणींचे कोठे, श्रीमंत ठाकूर, चौधरी किंवा तत्सम घराण्याचा नायक आणि कोठय़ावर गाणारी-नाचणारी नायिका, समाजास मान्य नसलेले त्यांचे प्रेम, अनौरस मुलाचा संघर्ष अशाच गोष्टींनी रुपेरी पडदा भरून टाकला होता. या सगळ्या कथा इतक्या वर्षांनी एकाच चित्रपटात उतरल्या तर काय होईल? हा विचार आपल्या मनात धडकी भरवणारा असेल कदाचित, मात्र दिग्दर्शक अभिषेक वर्मन या कल्पनेनेच भारावून गेला असावा अशी शंका येते. मात्र  ‘कलंक’ची कल्पना पाहून प्रेक्षकांच्या काळजाच्या चिंधडय़ा उडाल्या आहेत.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच राजस्थानी हवेल्यांच्या गर्दीतून नाचणारी, आकाशात विहरणाऱ्या पतंगांचा माग घेत भिरभिरता पतंग पकडत बागडणारी रूप (अलिया भट्ट) आपल्याला दिसते. एकीकडे चौधरींच्या खानदानातील समजूतदार ‘बहू’ सत्या (सोनाक्षी) आहे. कर्करोगाशी झगडणारी सत्या आपल्यानंतर पतीचे आयुष्य सावरले जावे यासाठी रूपला वर्षभर हवेलीत येण्याची विनंती करते. मात्र, कधीकाळी केलेल्या उपकाराच्या बदल्यात सत्या आपले आयुष्य मागते आहे या विचाराने धुमसत असलेली रूप लग्न करूनच हवेलीत येण्याची अट सत्यासमोर ठेवते. हा सगळा ड्रामा रचताना त्यात काहीच भावनिक क्षण किंवा गुंतागुंत दाखवता आली नसती असे नाही. रागाच्याच भरात देवला न पाहता त्याच्याशी (आदित्य रॉय कपूर) लग्न करून हवेलीत आलेली रूप एकीकडे.. तर रूपच्या भावनांची काहीही जाणीव नसलेला आणि पत्नीच्या आग्रहापोटी रूपशी लग्न केलेला देव दुसरीकडे. लग्नाच्या पहिल्याच रात्री या वैवाहिक नात्यात आदर असेल, प्रेम नाही हे सांगणारा देव त्याच क्षणी रूपची सगळी आशा मोडीत काढतो. दोन ध्रुवांवर दोघे आपण अशा पद्धतीने वावरणाऱ्या या दोघांनाही एकत्र आणण्याचे सत्याचे प्रयत्नही तोकडेच पडतात. आणि मग या त्रिकोणात चौथे वादळ येते ते जफरच्या (वरुण धवन) रूपाने. अनौरस मुलगा म्हणून समाजाकडून हेटाळणीच स्वीकारत वाढलेला जफर आपल्या मनातल्या रागाचे शस्त्र करत अब्दुलला (कुणाल खेमू) हाताशी धरून बलराज चौधरी (संजय दत्त) आणि पर्यायाने त्याचा मुलगा देव यांच्याविरोधात बंड पुकारतो.

या सगळ्या कथेच्या गुंताळ्याला पुन्हा फाळणीचा संदर्भ जोडला आहे. स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर असलेला देश, भारतात उभे राहत असलेले ब्रिटिशांचे कारखाने आणि त्यात आपला व्यवसाय नष्ट होणार या भीतीने त्रस्त झालेले कारागीर या सगळ्यातून उभा राहिलेला संघर्ष थेट हिंदू-मुस्लीम दुफळी निर्माण करतो. या सगळ्या पाश्र्वभूमीवर रूप-देव-जफरची कथा आणखी अडकत जाते. इतक्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे एकमेकांत अडकलेले धागे आहेत की मूळ कथा काय हेच कोणाला लक्षात येऊ नये. हा गोंधळ सांगण्यामागचे कारण म्हणजे आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा इथे आहे ती बहार बेगमची (माधुरी दीक्षित). आता या सगळ्यांचाच एकमेकांशी संबंध आहे आणि त्यातून गुंता सोडवण्यापेक्षा तो वाढवण्यातच दिग्दर्शकाला जास्त रस आहे.

एखादे सहजी सुटेल असे वाटणारे कोडे मुद्दाम अवघड करून ठेवायचे आणि त्याचे उत्तर हाती लागतेय म्हणताच आता तुम्हीच ठरवा त्याचे उत्तर काय ते.. या खाक्यात दिग्दर्शकाने यात प्रेम आहे की कलंक हे शोधण्याची जबाबदारीही प्रेक्षकांवरच टाकली आहे. त्यामुळे शोकांतिका नाही की सुखांतिका नाही, या छळाला काही अंतच नाही याच विचाराने आपण बाहेर पडतो. जवळपास तीन तास घालवल्यानंतर भव्य सेट्स, त्याचे अतिशय सुंदर चित्रण आपल्याला पाहायला मिळते. अर्थात, ही भव्यदिव्यता कथेला किंवा व्यक्तिरेखांना सहज उचलून धरत नाही. म्हणजे भन्साळींचे चित्रपट भव्य असले तरी ते कुठेही खोटे वाटत नाहीत. इथे सगळेच जाणीवपूर्वक भव्य करण्याच्या नादात ते ते कलाकार त्या त्या साच्यात बसवले असावेत, अशा पद्धतीने ते सगळे समोर येतात. त्यामुळेच की काय अलिया, वरुण, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित ही चार मोठी नावे असतानाही त्यांचा कणमात्रही प्रभाव पडत नाही.

वरुण धवनला जफरसाठी वेगळा लुक देण्यात आला आहे, तो कथेच्या केंद्रस्थानी आहे. त्याने सहजतेने जफरची व्यक्तिरेखा उत्तम वठवली आहे. अलिया उत्तम अभिनेत्री असली तरी या साच्यामध्ये तिच्यातली सहजता हरवलेली दिसते. त्यातही हट्टी, अल्लड अशा व्यक्तिरेखा तिने वारंवार केल्या असल्याने त्यातही फार नावीन्य नाही. तुलनेने माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या भूमिका छोटेखानीच आहेत. माधुरीचे नृत्य ही रसिकांसाठी पर्वणी आहे, तर संजय दत्तने साकारलेला बलराज त्यांच्यात असूनही नसल्यासारखाच वावरताना दिसतो. यातही खरे म्हणजे बलराज चौधरीची व्यक्तिरेखाही त्याच पठडीबाज पद्धतीने समोर येते. त्याच्या व्यक्तिमत्त्वात फारसे बदल दाखवण्याच्या भानगडीत दिग्दर्शक पडलेला नसल्याने संजय दत्तनेही ती मेहनत घेतलेली नाही. सोनाक्षी सिन्हा तिच्या अगदी छोटय़ा भूमिकेत चपखल बसली आहे. अलियाच्या रूपपेक्षाही तिने साकारलेली सत्या जास्त प्रभावी ठरते. आदित्य रॉय कपूरने देवच्या व्यक्तिरेखेला मर्यादा असूनही त्याला न्याय दिला आहे; पण इतके तगडे कलाकार असताना आणि नाटय़ पुरेपूर ठासून भरलेले असताना मसाला पद्धतीचे मनोरंजन करण्यातही चित्रपट सपशेल अपयशी ठरला आहे. एक ना धड भाराभर चिंध्या एका देखण्या सेटवर भरत उभे केलेले हे ‘कलंक’नाटय़ पुरते फसले आहे.

* दिग्दर्शक – अभिषेक वर्मन

*  कलाकार – अलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य रॉय क पूर, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, अंचित कौर, कियारा अडवाणी.