एकांकिकांमध्ये वेगळेपण जपणाऱ्या ‘अस्तित्व’ आणि ‘चारमित्र’ कल्याण संयुक्त विद्यमाने आयोजित कै. श्री. “मु.ब.यंदे पुरस्कृत” बत्तीसाव्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक -२०१८’ मध्ये दिशा थिएटर्स,ठाणेची दीपाली घोगे लिखित,ऋतूराज फडके दिग्दर्शित ‘अस्तित्व’ सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली तर उन्नती आर्ट्स, मुंबईची प्रमोद शेलार लिखित –दिग्दर्शित ‘भूत..मनातलं की….’ ही एकांकिका द्वितीय पारितोषिक विजेती ठरली.

यंदाचा विषय अनेक बहुआयामी एकांकिका सादर करण्याची संधी स्पर्धकांना देऊन गेला. गेली बत्तीस वर्ष सुरु असलेल्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात,याचा प्रत्यय यंदाही आला. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत वीस संघांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी सतरा एकांकिका सादर झाल्या. प्राथमिक फेरीचे परीक्षण रमेश मोरे, गिरीश पतके, नीळकंठ कदम आणि रवींद्र लाखे या मान्यवरांनी केले.

अंतिम फेरीचे परीक्षण विजू माने आणि विद्याधर पाठारे या नाट्यक्षेत्रातल्या मान्यवर परीक्षकांनी केले.स्पर्धकांना मार्गदर्शन करताना विजू माने यांनी खुल्या गटातल्या या स्पर्धेतल्या विविध वयोगटांच्या तितक्याच ताकदीने सादर होणाऱ्या उर्जेचे विशेष कौतुक केले.

लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक दीपाली घोगे यांना ‘‘अस्तित्व’ या एकांकिकेसाठी देण्यात आले,याच एकांकिकेसाठी ऋतूराज फडके सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला. ‘‘अस्तित्व’ च्या प्रसाद दाणी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात आले तर याच एकांकिकेसाठी राजश्री परुळेकर -म्हात्रे यांना तृतीय तर ‘भूत..मनातलं की….’ साठी आश्लेषा गाडेला चतुर्थ आणि ‘टाहो’ साठी अनिकेत चव्हाणला पंचम पारितोषिक मिळाले. स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता अभिनय ही एकच श्रेणी या स्पर्धेत असते.

‘भूत..मनातलं की….’ या एकांकिकेसाठी श्याम चव्हाण सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार तर ‘अस्तित्व’साठी प्रांजळ दामले आणि प्रीतीश खंडागळे सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार आणि संगीतकार पुरस्काराचे मानकरी ठरले.

अंतिममध्ये सादर झालेल्या एपिटोम थिएटर्स,मुंबईची स्वप्नील चव्हाण लिखित स्वप्नील टकले आणि गिरीश सावंत दिग्दर्शित ‘टाहो’, रंगभूमी कलाकार,मुंबईची चंद्रमणी किर्लोस्कर लिखित अभिजित मणचेकर दिग्दर्शित ‘कपाळमोक्ष’’ या एकांकिकाही उल्लेखनीय होत्या.