बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येमागे अभिनेता सलमान खानचा हात होता असं म्हटलं जात आहे. परिणामी सलमानवर आता जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान अभिनेता कमाल आर. खान याने देखील सलमानवर निशाणा साधला आहे. “काही तरी केल्याशिवाय कोणी उगाचच सलमानवर आरोप करत नाही”, असा उपरोधिक टोला त्याने लगावला आहे.

“संपूर्ण जगाला माहिती आहे सलमानने विवेक, जॉन आणि अर्जित यांच्यासोबत काय केलं. आता सोनू निगम, साहिल खान आणि इतर कलाकार त्याच्यावर आरोप करत आहेत. हा निव्वळ योगायोग नाही. सलमानने नक्कीच यांच्यासोबत काही तरी केलं आहे. उगाचच कोणी त्याच्यावर आरोप करत नाही.” अशा आशायाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने सुशांतच्या आत्महत्येचे निमित्त साधून सलमान खानवर निशाणा साधला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.