करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाउन जारी केला आहे. लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडण्यास बंदी आहे. मात्र काही लोक नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गोळा होत असल्याच्या घटना अद्याप घडत आहेत. त्यावरुन अभिनेता कमाल आर खान याने संताप व्यक्त केला आहे. लॉकडाउनच्या काळात नियमभंग करुन नमाज अदा करण्यासाठी परवानगी देणाऱ्या इमामांना तुरूंगात टाका अशी मागणी त्याने केली आहे.

नेमकं काय म्हणाला कमाल खान?

“लॉकडाउन असताना ज्या इमामांनी काल नागरिकांना नमाज अदा करण्यासाठी कायदा मोडून मशिदीत येण्याची परवानगी दिली त्यांना तुरुंगात टाकावं. धर्माच्या नावाखाली कुणालाही कायदा मोडण्याचा अधिकार नाही.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

प्रकरण काय आहे?

एनडिटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पश्चिम बंगालमधील छिंदवाडा जिल्ह्यातील काही मुस्लीम धर्मीय लोक लॉकडाउनच्या काळात नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये गोळा झाले होते. या प्रकरणी ४० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हाच प्रकार ग्रेटर नोएडा आणि पश्चिम बंगालमध्ये देखील घडला होता. या पार्श्वभूमावर कमाल खानने हे ट्विट केले आहे. कमाल खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.