कमल हसनचे हिंदी चित्रपट म्हटले की पटकन आठवतात ते ‘एक दुजे के लिए’, ‘जरा सी जिंदगी’, ‘सदमा’ (हे तीनही दक्षिणेकडील भाषिक चित्रपटाचे रिमेक), ‘पुष्पक’ (संवादरहित), ‘सागर’, ‘चाची ४२०’, ‘यह तो कमाल हो गया’ असेच काही. पण त्याचा ‘करिश्मा’ (१९८४) नावाचाही बहुचर्चित चित्रपट होता. पण तो प्रदर्शित होताच सगळीच चर्चा थंडावली.

हा चित्रपट देखील त्याचीच भूमिका असणार्‍या ‘टीक टीक टीक’ या भारती राजा दिग्दर्शित तमिळ चित्रपटाची हिंदीतील रिमेकच. दक्षिणेकडील बहुचर्चित दिग्दर्शक आय. व्ही. ससी (‘हर नाईट्स’ हा त्यांचा तमिळ चित्रपट धाडसी कथानकामुळे खूप गाजला.) यानी हिंदीत तो ‘करिश्मा’ नावाने आणला. आपणच मूळ चित्रपटात साकारलेली भूमिका रिमेक चित्रपटात साकारणे तसे सोपे. पण या चित्रपटाची रिमेक करणे कसे सुचले? तर रिना रॉयची बहिण बरखा रॉय हिने कमल हसन व रिना रॉय या जोडीला घेऊन निर्मिलेला ‘सनम तेरी कसम’ (दिग्दर्शक नरेंद्र बेदी) हा सुपर हिट झाला होता. मुंबईत मेट्रो थिएटरमध्ये त्याने मॅटीनी शोला रौप्य महोत्सवी यश संपादन केलेले. त्या यशानंतर कमल हसन व रिना रॉय जोडीचा ‘करिश्मा’.

हा चित्रपट सेन्सॉरकडे गेला आणि वेगळ्याच कारणास्तव चर्चेत आला. ते म्हणजे, स्वरुप संपतचे त्यातील बिकीनी रुप. ‘नरम गरम’सारख्या निखळ विनोदीपटात सोबर भूमिका साकारणारी स्वरूप संपत चक्क असे धाडसी दृश्य देते? असाच प्रश्न पडला. पण दिग्दर्शकाचे नाव वाचून सगळेच गप्प होत. पण चित्रपटात काहीतरी ‘भारी’ पाह्यला मिळेल असे वातावरण तयार होत गेले. येथेही दिग्दर्शक दिसतो असे म्हटले तरी चालेल. आणि हो, याच ‘करिश्मा’मध्ये टीना मुनिम ही आणखीन एक नायिका.

कमल हसन नायक व त्याला तीन नायिका म्हणजे या चित्रपटात असे आहे तरी काय याची प्रचंड उत्सुकता वाढणे अत्यंत स्वाभाविक होतेच. कमल हसन एक फोटोग्राफर असतो आणि त्याच्या करियरचा एक भाग म्हणून या तिघी असतात. अशातच स्वरूप संपतचे बिकीनीतील फोटो शूटच्या वेळेस त्याच्या लक्षात येते की तिच्या एका पायाच्या वरच्या भागावर जखम आहे. पण ही जखम नव्हे तर छोटी शस्त्रक्रिया आहे. पण कसली?

या चित्रपटाचे रहस्य नाट्य अशाच काही गोष्टींतून रंगलय. ‘त्या’ शस्त्रक्रियेच्या आड हिरे स्मगलिंग होत असतात. एक मोठी साखळी त्यात असते. हा एक वेगळाच व्यापार असतो. त्यात डॅनी डेन्झोपाचा मास्टर माइंड असतो. त्याचा उजवा हात महेश आनंद युवतींचा दीवाना असतो. कधी त्याचा तोल सुटतो व हा खेळ वेगळेच वळण घेतो.

हे असे नाट्य हिंदी चित्रपटाच्या रसिकांना रुचले नाही. चित्रपट गल्लापेटीवर फ्लॉप ठरला. म्हणूनच त्याची त्यानंतर कधीच कोणी आठवण काढली नसावी. चित्रपटात सारीका (या चित्रपटानंतर ती कमल हसनची पत्नी झाली), जगदीप, रझा मुराद, विजू खोटे, मॅकमोहन, सत्येन कप्पू, बेबी पिंकी यांच्याही भूमिका आहेत. याच काळात महेश आनंदने निर्माती बरखा रॉयशी लग्न केले हा देखिल एक ‘करिश्मा’च!
राहुल देव बर्मनचे चित्रपटाला संगीत होते. पण काहीच खास ‘करिश्मा’ ते दाखवू शकले नाही. कमल हसनची फोटोग्राफरची भूमिका एवढीच या चित्रपटाची आठवण. पण चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीतील उलटसुलट चर्चा चित्रपटाला यश मिळवून देण्याचा ‘करिश्मा’ दाखवू शकले नाही. म्हणूनच तर कमल हसनचा ‘करिश्मा’ नावाचाही हिंदी चित्रपट होता याची फारशी कधी आठवण येत नाही. यावरून यशाचा ‘करिश्मा’ किती व कसा महत्त्वाचा असतो ते पटावे.
दिलीप ठाकूर