तामिळनाडूमध्ये चित्रपट अभिनेते मुख्य प्रवाहातील राजकारणावर वर्चस्व गाजवतात हे एम. जी. रामचंद्रम ते जयललिता यांच्यापर्यंत आपण पाहिले आहे, त्यामध्ये आता नव्या अभिनेत्याची भर पडणार असून त्या अभिनेत्याचे नाव कमल हसन असे आहे. तामिळनाडूतील सध्याची राजकीय स्थिती पाहता कमल हसन हे या महिनाअखेरीला नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे हसन यांच्या निकटवर्तीयाने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. नव्या पक्षाचे लक्ष नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आहे.

नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू झाली असून त्याबाबतची घोषणा विजयादशमी अथवा गांधी जयंतीच्या दिवशी केली जाणार आहे. कमल हसन यांनी आपल्या चाहत्यांशी याबाबत चर्चा केलेली नाही, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे पक्ष स्थापन करण्यात येणार आहे, असे कळते. विरोधी पक्ष द्रमुकने अथवा सत्तारूढ अभाअद्रमुकने अन्य पक्षांशी आघाडी करण्यापूर्वी राजकीय क्षेत्रांत उतरणे कमल हसन यांना गरजेचे वाटते, असे हसन यांच्या अन्य एका निकटवर्तीयाने सांगितले.

वाचा : सोशल मीडियावरील पोस्टनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळालं काम

तामिळनाडूत राजकीय पोकळी निर्माण झाली असल्याने नव्या पक्षासाठी ही योग्य वेळ आहे, हसन यांना चाहत्यांचा आणि जनतेचा वाढता पाठिंबा आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आपल्याला राजकीय क्षेत्रांत प्रवेश करावासा वाटतो, असे हसन यांनी म्हटले होते.