चित्रपटाशी संबंधित अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, गीतकार, गायक आणि नृत्यदिग्दर्शक अशा जवळपास सर्वच भूमिकांत आपला ठसा उमटवणारे अष्टपैलू कलाकार कमल हसन याना ‘मामि’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कमल हसन यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्याच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होत असल्याचे ‘मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हींग इमेज’ (मामि)चे अध्यक्ष श्याम बेनेगल यांनी सांगितले.
‘मामि’ महोत्सवात दरवर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत आणि जागतिक स्वतरावरील एका कलावंताला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी पद्मश्री किताबासह तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या आणि आत्तापर्यंत १९० चित्रपटातून काम केलेल्या कमल हसनला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच फ्रेंच चित्रपटकर्मी कोस्टा गवारस यांनाही जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. १९६९ साली ‘झेड’ चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट विदेशी भाषेतील चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार, १९८२ साली ‘मिसिंग’ चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट लेखनासाठी ऑस्कर पुरस्कारासह अनेक मानसन्मान मिळवणाऱ्या कोस्टा गवारस यांनी हा ‘मामि’चा जीवनगौरव पुरस्कार घेण्यासाठी स्वीकृती दर्शवल्याबद्दल बेनेगल यांनी समाधान व्यक्त केले. ‘मामि’ महोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून यावेळी ६५ देशांमधून निवडण्यात आलेले २०० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. १७ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१३ दरम्यान होणारा हा महोत्सव मेट्रो सिनेमा, लिबर्टी सिनेमा आणि अंधेरीतील सिनेमॅक्स चित्रपटगृह अशा तीन ठिकाणी होणार आहे.