News Flash

‘कंदील’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित

मोशन पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात काही तरी वेगळं आणि वर्तमान समाजव्यवस्थेवर मनोरंजक शैलीत भाष्य करणारं कथानक पाहायला मिळणार याची जाणीव होते.

‘हातात घेऊन सपनाची भिंग निघाले बघाया सशाचे शिंग पोरांना चढली श्रीमंतीची झिंग’ या एका ओळीवर आधारलेला एक नवाकोरा सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो आहे. ‘कंदील’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट १९ व्या ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये (पिफ) निवडला गेला आहे. महेश कंद या नवोदित दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला ‘कंदील’ देशविदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये हजेरी लावणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आशा आणि निराशेच्या लाटेवर स्वार होऊन श्रीमंत होऊ पाहणाऱ्या झोपडपट्टीतील पाच मुलांची अनोखी कथा ‘कंदील’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच समाजमाध्यमांवरून प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये कंदिलाचे चित्र असून त्या चित्राच्या पार्श्वभूमीवर पाच तरुण दिसतात. एका झाडाखाली असलेल्या दगडावर तीन तरुण बसलेले आहेत, चौथा तरुण झाडाला टेकून तर पाचवा हाताची घडी घालून जणू भविष्यावर नजर रोखून उभा आहे. ‘श्रीमंत… श्रीमंत…’ या गाण्याच्या (मुखड्याची) संगीतमय जोड या मोशन पोस्टरला देण्यात आली आहे. मोशन पोस्टर पाहिल्यावर या चित्रपटात काही तरी वेगळं आणि वर्तमान समाजव्यवस्थेवर मनोरंजक शैलीत भाष्य करणारं कथानक पाहायला मिळणार याची जाणीव होते. एल. के. पिक्चर्स या बॅनरअंतर्गत निर्माते लक्ष्मण कंद, अभिजीत कंद आणि महेश कंद यांनी समाजमाध्यमांवर मोशन पोस्टर प्रदर्शित करत ‘कंदील’ चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘कंदील’चं दिग्दर्शन करणाऱ्या महेश कंद यांचा इथवरचा प्रवास खूप संघर्षमय आहे. त्यांनी कोणत्याही फिल्म स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले नाही. फिल्म फेस्टिव्हल, फिल्म क्लबमध्ये जाऊन सिनेमाचे तंत्र स्वत: आत्मसात केले आहे. महेशने यापूर्वी चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून खूप काम केलं आहे. ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी सिनेमासाठी दिग्दर्शक मिलिंद उके यांना त्यांनी साहाय्य केलं आहे. बरीच वर्षे लेखक अमरजीत आमले यांच्या सान्निध्यात राहून त्यांनी सिनेमाचे धडे गिरवले आहेत. फग्र्युसन कॉलेजमध्ये पार्ट टाइम डिप्लोमा इन फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. ‘कंदील’ची कथा हातात आल्यानंतर महेशने हा विषय पडद्यावर कशा पद्धतीने मांडायचा यासाठी तीन वर्षे झोपडपट्टीमध्ये जाऊन संशोधन केले. विशेष म्हणजे संपूर्ण सिनेमा आधी मोबाइलमध्ये चित्रित करून पाहिला आणि नंतरच प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात केली. शूटिंग करतानाही ‘कंदील’च्या टीमला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला, तरीही न डगमगता महेशने नवोदित कलाकार-तंत्रज्ञांचा संच सोबत घेऊन अखेर ‘कंदील’ साकारलाच. आज या कंदिलाचा प्रकाश सिनेमहोत्सवांच्या माध्यमातून देशविदेशात आणि त्यानंतर प्रत्येक घराघरात प्रकाशाची किरणं पोहोचणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 2:22 pm

Web Title: kandil movie poster published akp 94
Next Stories
1 “नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील”; सलमान खानचा संतप्त इशारा
2 “उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार”, वर्षभरानंतर कंगनाच्या ‘या’ वक्तव्यावर राम गोपाल वर्मा झाले व्यक्त
3 “बिग बॉसमध्ये खरोखरच अभिनव शुक्लाबद्दल ओढ निर्माण झाली”; राखी सावंतचा खुलासा
Just Now!
X