मुंबई महापालिकेने आपल्या बंगल्यातील बांधकाम बेकायदेशीररीत्या तोडल्याचा आरोप करत अभिनेत्री कंगना राणावत हिने पालिकेकडे त्याची नुकसानभरपाई म्हणून दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. या मागणीसाठी कंगनाने मंगळवारी उच्च न्यायालयात सुधारित याचिका केली.

राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा सूड म्हणून पालिकेने आपल्या बंगल्यातील बांधकामावर कारवाई केल्याचा आरोप कंगनाने आपल्या सुधारित याचिकेत केला आहे. आपण एक सार्वजनिक वलय असलेली व्यक्ती आहोत. तसेच महत्त्वाच्या मुद्दय़ांवर ती आपली मते मांडत असते. काही जनहितार्थ मुद्दे राज्य सरकारकडून योग्य प्रकारे हाताळले जात नसल्याबाबत आपण आपली मते व्यक्त केली होती. त्यावरून सरकारचा भाग असलेल्या एका राजकीय पक्षाकडून आपल्याला लक्ष्य केले जात आहे. मुंबईत येण्यावरूनही आपल्याला धमकावण्यात आले. याच राजकीय पक्षाची पालिकेत सत्ता आहे.  पालिकेने केलेली कारवाई  बेकायदा ठरवावी आणि नुकसानभरपाई म्हणून दोन कोटी रुपये देण्याचे आदेश पालिकेला द्यावेत, अशी मागणी कंगनाने केली आहे.