दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका अस तिने म्हटलं आहे. याबाबतचा एक व्हिडिओ संदेश तीने ट्विटरवरुन पोस्ट केला आहे.

कंगनानं म्हटलं, “आज प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला आणि तिथं खलिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आजचा प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशासाठी आनंदाचा ठरला असता. मात्र, देशभरातून आणि लाल किल्ल्यावरुन जे फोटो आले आहेत ते विषण्ण करणार आहेत.”

“स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. हे खुलेआम होत असून सर्वांच्या समोर हा तमाशा सुरु आहे. जगात आज आपली खिल्ली उडवली जात असेल आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही, आपण केव्हाही अडाण्यासारखे वागतो. दुसऱ्या देशाचे पंतप्रधान भारतात आले तरी आपण नग्न होऊन बसतो. यामुळे या देशाचं काहीही होणार नाही. जर सर्वकाही असंच सुरु राहिलं तर कोणी देशाला दहा पाहलं पुढे नेऊ पाहत असेल तर तो वीस पावलं मागं आणण्याचं काम केलं जात आहे आणि आपण सर्वजण केवळ तमाशा पाहत आहोत.”

“जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाका. तसेच त्यांची सर्व प्रकारची संपत्ती जप्त केली जावी, अशी मागणी करताना हा देश, याचं सर्वोच्च न्यायालय, इथलं सरकार हे सर्व थट्टा बनून राहिलं आहे,” अशा शब्दांत कंगनानं आजच्या हिंसाचारावर भाष्य केलं.