कंगना चांगली अभिनेत्री असली तरी यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार बाजीराव-मस्तानी चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिकाला मिळावा ही माझी इच्छा होती, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी व्यक्त केली. ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे काल जाहीर करण्यात आली होती. कंगना राणावतने लागोपाठ दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला होता. ‘तनू वेडस मनू रिटर्न्‍स’ चित्रपटातील दुहेरी भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले की, कंगना एक चांगली अभिनेत्री आहे. मात्र, यंदाचा पुरस्कार दीपिका किंवा प्रियांकाने जिंकावा, अशी माझी सुप्त इच्छा होती. बाजीराव मस्तानीमधील या दोघांचा अभिनय उत्कृष्ट होता, असे भन्साळी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. मात्र, परीक्षकांच्या मते कंगना सर्वोत्कृष्ट ठरली, तिने तनू वेडस मनू रिटर्न्‍स’मध्ये अफलातून काम केले आहे, हे मला मान्य आहे. तिला पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे. मात्र, एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून हा पुरस्कार प्रियांका किंवा दीपिकाने जिंकावा ही माझी इच्छा होती, असे भन्साळी यांनी सांगितले.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत बॉलीवूडचे वर्चस्व 
कंगनाचा हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘क्वीन’ या चित्रपटासाठी तिला गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. यापूर्वी २००८ मध्ये ‘फॅशन’ चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.