मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना पालिकेने तिच्या घरातील कार्यालयात उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर बुधवारी कारवाई केली. पालिकेने बांधकाम पाडलेल्या या कार्यालयाची पाहणी कंगनाने गुरुवारी दुपारच्या सुमारास केली. कंगना हिमाचल प्रदेशातून बुधवारी मुंबईत दाखल झाली. पण ती मुंबई दाखल होण्यापूर्वीच पालिकेने कारवाई केली.

कंगनाने मुंबईतील परिस्थिती पाकिस्तानव्याप्त काश्मीरप्रमाणे असल्यासारखे म्हटल्याने टीका झाली होती. त्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला होता. तसेच आपण ९ तारखेला मुंबईत येत असून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आवाहन दिले होते. बुधवारी कंगना मुंबईत पोहोचली. महापालिकेचे कर्मचारी तिच्या घरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी गेले असता कंगनाने ट्विटरवरून त्यांचा समाचार घेतला.

आणखी वाचा : कंगनाच्या ऑफिसवर कारवाई : शशांत केतकर भडकला म्हणाला, ‘इथे सगळेच…’

कंगनाच्या घरात १४ अनधिकृत बांधकामे केल्याचे पालिकेच्या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. काही ठिकाणी अनधिकृतपणे खोल्या उभारण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले होते. मात्र मुंबई महापालिकेने कालपर्यंत कोणतीही नोटीस पाठवली नाही. नूतनीकरणासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, कंगना बाहेरगावी गेली असताना तिच्या घरात असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई केलीच अशी, अशी विचारणा करत पालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली, तर कंगनाच्या घरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने केलेली कारवाई नियमानुसार आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.