मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. या कारवाईमुळे संतापलेली कंगना सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका करत आहे. महाराष्ट्र सरकार आणि कंगना यांच्यात सुरु असलेल्या या शाब्दिक द्वंद्वात आता अभिनेत्री फराह खान अली हिने उडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन तू तुझी योग्यता सिद्ध केलीस, असं म्हणत तिने कंगनावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चूकीचं आहे. तुझे असं बोलण्याची हिंमत तिने केलीच कशी? ते महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांना संबोधित करताना त्यांच्या पदाचा मान राखलाच गेला पाहिजे. एकेरी उल्लेख करुन तू तुझी योग्यता सिद्ध केलीस अशा आशयाचं ट्विट करुन फराह खान अली हिने कंगना रणौतवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात ठाकरे सरकारची दहशत वाढत चालली आहे अशी टीका अभिनेत्री कंगना रणौतने केली. आज एका निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. एका माणसावर सुमारे ८ ते १० लोकांनी हल्ला केला. त्यांची चूक इतकीच होती त्यांनी सरकारची निंदा केली. त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. ही बाब योग्य नाही असं म्हणत अभिनेत्री कंगना रणौतने ठाकरे सरकारवर टीका केली. कंगना रणौतने तिच्या फेसबुक पेजवरुन यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.