कंगना रणौत आणि वाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू. कंगनाचा आगामी ‘सिमरन’ सिनेमाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ज्या दिवसापासून हा टिझर प्रदर्शित झाला त्या दिवसापासून या सिनेमाशी निगडीत अनेक वाद समोर येऊ लागले. ‘सिमरन’ सिनेमाची संपूर्ण कथा आपणच लिहिल्याचे कंगनाने म्हटलेय. हे साफ खोटं असल्याचं लेखक अपूर्व असरानी याने त्याच्या फेसबुकवर पोस्ट केलंय.

हे कमी की काय आता पुढच्या वर्षी कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना झाशीच्या राणीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. कंगनावर या सिनेमाची संकल्पना चोरल्याचा आरोप दिग्दर्शक केतन मेहता यांनी केला आहे. दिग्दर्शक मेहता यांनी कंगनाविरोधात एक कायदेशीर नोटीस बजावली आहे. केतन यांनी कंगना, ‘मणिकर्णिका’ सिनेमाचे निर्माते कमल जैन आणि इतर टीमवर ‘रानी ऑफ झांसी- द वॉरिअर क्‍वीन’ या त्यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टची संकल्पना चोरल्याचा आरोप केला आहे.

केतन यांनी आपल्या जबाबात सांगितले की, ‘जून २०१५ मध्ये मी कंगनाला माझ्या सिनेमात राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी विचारले होते. तेव्हा तिने या सिनेमात काम करण्याचे मान्यही केले होते. आम्ही तिला सिनेमाची संहिता आणि काही संशोधन केलेली कागदपत्र पाठवली होती. या विषयावर आमच्या चर्चाही झाल्या होत्या. पण नंतर तिने ‘मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी’ Manikarnika – The Queen of Jhansi या सिनेमाची घोषणा दुसऱ्याच दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत केली. त्यामुळे आमच्या सिनेमाची संकल्पना चोरल्यामुळे आम्ही कंगनाला नोटीस बजावली आहे.’

काही दिवसांपूर्वी कंगनाने बनारस येथील दशाश्वामेध घाटावर ‘मणिकर्णिका’ सिनेमाचे २० फुटी पोस्टर प्रदर्शित केले होते. यावेळी तिने गंगा किनारी आरतीही केली होती. सिनेमाचे दिग्दर्शन राधा कृष्ण जगर्लामुदी म्हणजेच क्रिश हे करत असून ‘बाहुबली’चे लेखक के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनीच या सिनेमाची कथा लिहिली आहे. कंगनाने एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, ‘जेव्हा मी या सिनेमाला होकार दिला तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, आतापर्यंत कोणत्याही दिग्दर्शकाने राणी लक्ष्मीबाईंवर सिनेमा केलेला नाही. माझ्यासाठी ही एक चांगलीच गोष्ट आहे. कारण आता मी हा सिनेमा करत आहे.’ केतन मेहता यांनी ‘मिर्च मसाला’, ‘माया मेमसाहब’, ‘मंगल पांडे’ आणि ‘मांझी- द माऊंटनमॅन’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.