मोठ्या बहिणीनंतर माझ्या आई-वडिलांना खरंतर मुलगा हवा होता. पण दुसऱ्यांदा मुलगीच झाल्याने सुरुवातीला त्यांना माझ्याबद्दल फारसे प्रेम नव्हते. त्यांच्यासाठी मी नकोशीच होते, असा खळबळजनक खुलासा सध्याची आघाडीची अभिनेत्री कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात केला.
कंगना म्हणाली, माझी मोठी बहिण रंगोलीच्या जन्मानंतर आई-वडिल आणि इतर नातेवाईकांना खूप आनंद झाला होता. तिच्याकडे व्यवस्थित लक्षही देण्यात आले. पण तिच्यानंतर मुलगा व्हावा, अशी त्या दोघांची इच्छा होती. पण परत माझ्या रुपाने मुलीचाच जन्म झाल्याने ते सत्य स्वीकारणे त्या दोघांनाही थोडे जड गेले. आमच्याकडे जेव्हा जेव्हा कोणी पाहुणे येत, त्यावेळी ते दोघेही त्यांना याबद्दल कायम सांगायचे. त्यामुळे ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहिली. खरंतर अशा वातावरणात राहणे माझ्यासाठी खूप जड गेले. पण वस्तुस्थिती स्वीकारूनच मी वाटचाल करीत राहिले, असे तिने सांगितले.
आपली मोठी बहिण रंगोली हिचे कंगनाने या कार्यक्रमात खूप कौतुक केले. तिच्याकडून आपल्याला कायम ऊर्जा मिळत आली आहे. कायम तिच माझे प्रेरणास्थान असल्याचे कंगनाने सांगितले.