भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ७०वा वाढदिवस साजरा केला. मोदी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. जनमानसता त्यांची एक खास प्रतिमा आहे. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने देखील मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. लक्षवेधी बाब म्हणजे मोदींनी या शुभेच्छांसाठी करण जोहरचे आभार मानले. मात्र यामुळे अभिनेत्री कंगना रणौतला आता ट्रोल केलं जात आहे.

कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अलिकडेच तिने सुशांत मृत्यू प्रकरणाचं निमित्त साधून करण जोहरवर घराणेशाहीचे आरोप केले होते. काही भाजपा नेते मंडळी देखील तिच्या या मताशी सहमत होते. दरम्यान नरेंद्र मोदींनी करण जोहरच्या ट्विटला रिप्लाय दिला. या पार्श्वभूमीवर काही नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मोदींनी करणला रिप्लाय दिला पण कंगनाला नाही, अशा आशयाचा संदर्भ लावून ट्रोलर्सने सोशल मीडियावर कंगनाची खिल्ली उडवली आहे.

“करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार परत घ्या”

“करणने मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता. तसंच एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बोलताना मी कलाविश्व सोडून द्यावं असंही सांगितलं होतं. सुशांतसोबत सुद्धा असाच कट रचण्यात आला आहे. उरी हल्ला झाला त्यावेळीदेखील त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेतला पाहिजे”, असं कंगना म्हणाली होती. दरम्यान, सुशांतने आत्महत्या केल्यानंतर कंगनाने करण जोहरसह अनेकांवर घराणेशाहीचा आरोप केला. इतकंच नाही तर सुशांतची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असंही ती म्हणाली होती.