‘खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी’ झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्यगाथेचं वर्णन करण्यासाठी ही एक ओळ पुरेशी आहे. या रणरागिणीची शौर्यगाथा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर साकारण्याचं स्वप्न कंगनानं पाहिलं. ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’च्या रुपानं तिनं हे शिवधनुष्य पेललं आणि रुपेरी पडद्यावर उभी राहिली इंग्रजांशी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणारी ‘मर्दानी’ झाशीची राणी….

‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची गोष्ट सुरू होते अमिताभ बच्चन यांच्या खणखणीत आवाजानं. जिच्या बलिदानानं ही भारतभूमी पावन झाली, जिची शौर्यगाथा इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरात कोरली गेली ती राणी लक्ष्मीबाई नेमकी होती कशी?, याचं सुरूवातीलाच बच्चन यांनी केलेलं वर्णन चित्रपटाबद्दल कुतूहलं निर्माण करतं. मणिकर्णिका ते झाशीची सून असा प्रवास पूर्वार्धात रुपेरी पडद्यावर उभा राहतो. लग्नानंतर मणिकर्णिकेचं झाशीमध्ये आगमन होतं. परंपरेप्रमाणे नाव बदलून त्या झाशीचे राजे गंगाधररावांच्या पत्नी लक्ष्मीबाई होतात. या लक्ष्मीच्या पावलांनी इंग्रजांच्या जाचाखाली रोज मरणयातना भोगणाऱ्या झाशीच्या द्वारी आशेचा किरण येतो. राजसुखात रममाण न होता झाशीच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात स्थान मिळवण्यास लक्ष्मीबाई सफल होतात. बघता बघता लक्ष्मीबाई या गरिबाच्या कैवारी म्हणून झाशीच्या प्रत्येक घरात पूजनीय होतात. इंग्रज अधिकाऱ्यांचा मिजास पायदळी तुडवणारी ही राणी केवळ नावाची राणी नसून ती खऱ्या अर्थानं सामर्थ्यशालीदेखील आहे हे दाखवून देते. इंग्रजांना पळता भुई थोडी करणारी ती ‘मर्दानी’ असली तरी तिच्या हृदयात मात्र अपार प्रेम, करुणा, भूतदया, वाचनाची प्रचंड आवडही असते याची प्रचिती चित्रपट पाहताना येते. चित्रपटाच्या पूर्वाधात मणिकर्णिका ते राणी लक्ष्मीबाई यांच्या स्वभावाचे एक ना अनेक पैलू उलगडत जातात. मात्र हे पैलू उलगडत जाताना कथेवरची पकड कुठेतरी सुटत जात असल्याचं जाणवतं.

Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बच्चन यांनी केलेलं वर्णन मणिकर्णिकेला पाहण्याची जितकी उत्सुकता निर्माण करतं ती उत्सुकता कथा जशी पुढे सरकते तशी कमी कमी होत जाते.  राणी लक्ष्मीबाईंची गौरवगाथा अडीच तासांत पडद्यावर मांडणं हे किती अवघड आहे याची जाणीवही होते. मात्र पूर्वार्धाच्या शेवटच्या पाच मिनिटांत कंगनाचा अभिनय सारी उणीव भरून काढतो. पती आणि पोटच्या मुलाच्या निधनाचं शोक विसरून मातृभूमी संरक्षणासाठी ही राणी उभी राहते. त्या काळच्या रुढी माझ्या कर्तव्याच्या आड येऊ शकतं नाही हे राणी लक्ष्मीबाई ठणकावून सांगतात. माझं कुंकू पुसलंय पण झाशीचं नाही त्यामुळे तिच्यासाठी मला लढावंच लागेल अशा या दृढनिश्चयी राणीची ती मुद्रा पाहताच अंगावर रोमांच उभा राहतो. हे दृश्य पाच एक मिनिटांचं असलं तरी त्याकाळच्या कर्मठ लोकांना राणी लक्ष्मीबाईंनी कसं तोंड दिलं असेल याचा विचार करायला मन भाग पाडतं.

चित्रपटाचा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा वरचढ ठरतो. इंग्रजांबरोबर आपल्यातील बेईमान लोकांशी सुरू असलेला राणी लक्ष्मीबाईंचा लढा इथे दिसतो, मै अपनी झांशी नही दूँगी असं म्हणणारी मर्दानी आपल्या शरीरात शेवटचा प्राण असेपर्यंत लढण्याची शपथ घेते. यात राणी लक्ष्मीबाईंना झलकारी बाई, तात्या टोपे, पुरण सिंग, गौस बाबा या सगळ्यांची साथ लाभते. या साऱ्या शुरवीरांच्या सोबतीनं राणी लक्ष्माबाई इतिहासात झाशीचं नाव अजरामर करतात. या चित्रपटात कंगना महत्त्वाच्या भूमिकेत आहे त्यामुळे अर्थात तिच्याकडून प्रेक्षकांच्या खूपच अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण होतील याची काळजी कंगनानं घेतली आहे. राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा साकारताना कुठेही अपेक्षाभंग होणार नाही हा प्रामाणिक प्रयत्न कंगनानं केला अन् यात ती यशस्वीही झाली. तिची तलवारबाजी, घोडेस्वारी, आक्रमकता सारं काही कंगनानं जीव ओतून केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तात्या टोपे यांच्या भूमिकेत असलेला अतुल कुलकर्णी , झलकारीबाईंच्या भूमिकेतील अंकिता लोखंडे, वैभव तत्त्ववादी यांच्या भूमिका अगदी लहान असल्या तरी या तिघांच्याही भूमिका कंगनाच्या तोडीच्या ठरतात. अंकितानं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. तिच्या वाट्याला आलेलं काम तुलनेनं कमी असलं तरी तिनं योग्य तो न्याय झलकारीबाईंच्या भूमिकेसाठी दिलाय. या चित्रपटाचे संवाद प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत.

मणिकर्णिकाचं दिग्दर्शनही दस्तुरखुद्द कंगनानं केलं आहे. दिग्दर्शनाची धुरा सांभाळणं कंगनासाठी नक्की सोपं नव्हतं. चित्रपटात अनेक ठिकाणी सिनेमॅटीक लिबर्टी घेण्यात आलीये. ती काही दृश्य पाहताना खटकते. काहीतरी कमी असल्याची जाणीव चित्रपटाच्या सरत्या कहाणीबरोबर होत जाते. खरं तर राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा अडीच तासांत दाखवणं हे सोप नाही मात्र तरीही कंगनानं ते धाडस केलं त्यामुळे तिचं विशेष कौतुक.  कथा, संवाद, दिग्दर्शन यासारख्या गोष्टी असल्या तरी एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावीशी वाटते ती म्हणजे या चित्रपटातील कंगनाची वेशभूषा. खरं तर ऐतिहासिक चित्रपट म्हटला की तशी वेशभूषा ही ओघानं आलीच पण कंगनानं व्यक्तीरेखेच्या वेशभूषेला ‘ग्लॅमर’ची किनार चढवली आहे. मराठी घरात जन्मलेली राणी पडद्यावर दाखवताना मात्र तिच्या वेशभूषेला असलेली बॉलिवूडच्या ग्लॅमरची किनार काहीशी खटकते. कंगनाचा हा पहिला प्रयत्न आहे , तिनं निवडलेला विषयही अवघड आहे त्यामुळे तिला यात पास करायचं की नापास हे सर्वस्वी आता प्रेक्षकांच्या हाती आहे.

झाशीच्या राणीची शौर्यगाथा वाचून आपण लहानाचे मोठे झालो ही शौर्यगाथा कंगनानं रुपेरी पडद्यावर साकारण्याचं धाडस केलंय. त्यामुळे यातल्या उणीवा बाजूला ठेवून केवळ तिच्या धाडसासाठी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन एकदा पहायला हरकत नाही हे नक्की!

प्रतीक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com