अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. बॉलिवूडवर केले जाणारे आरोप असो किंवा देशात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर खळबळजनक मत मांडणं यात कंगना कायम आघाडीवर असते. सोशल मीडियावर कंगनाला तिच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा ट्रोलही केलं जातं. पुन्हा एकदा कंगनाने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. कंगनाने तिच्या एका ट्विटमधून बॉलिवूडमध्ये मूव्ही माफियांची दहशत असल्याचं म्हंटलं आहे.

कंगना रणौतने पटकथा लेखक अनिरुद्ध गुहा यांच्या एका ट्विटला उत्तर देताना बॉलिवूडवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. बॉलिवूडमध्ये मूव्ही माफियांची दहशत असल्याने अनेक बडे कलाकार माझं जाहीरपणे कौतुक करायलाही घाबरत असून ते मला गुपचूप फोन करत असल्याचं कंगना म्हणाली आहे. यामध्ये तिने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं देखील नाव घेतलं आहे. अनिरुद्ध गुहा यांनी एका ट्विट करत कंगनाचं कौतुक केलं आहे. बॉलिवूडच्या विरोधात जाणं तुम्हाला धोक्याचं ठरू शकतं अशी एक पोस्ट अनिरुद्ध यांना दिसली. या पोस्टला रिट्विट करत ते म्हणाले, ” कंगना रणौत याला अपवाद आहे, पिढीमध्ये एकदाच होणारी अभिनेत्री.” असं ते म्हणाले आहेत.

कंगना रणौतने अनिरुद्ध यांच्या ट्विटला उत्तर देत बॉलिवू़डवर निशाणा साधला. “बॉलिवूडमध्ये इतकं शत्रूत्व आहे की माझी स्तुती करणंही एखाद्याला महागात पडू शकतं. मला सिक्रेट कॉल आणि मेसेज येतात. अक्षय कुमारसारख्या बड्या स्टार्सचेही. त्यांनी थलायवीचं खूप कौतुक केलं पण आलिया आणि दीपिकासारखं ते माझं जाहीरपणें कौतुक नाही करू शकत. मूव्ही माफियांची दहशत.” असं ट्विट करत कंगनाने बॉलिवूडमधील गटबाजीवर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कंगना तिच्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाली आहे. ” कलेशी संबधित या क्षेत्राचं उदिष्ट कलाच असायला हवं होतं. पावरच्या या खेळात आणि राजकारणात सामील न होता, खास करून जेव्हा सिनेमाची वेळ येते. माझ्या राजिकय आणि आध्यामिक विचारांवरून मला लक्ष करून माझा छळ करू नये आणि असं जर केलं तर अर्थातच मी जिंकेन.” अशा आशयाचं ट्विट तिने केलं आहे.

बॉलिवूडवर आरोप करण्याची कंगनाची ही काही पहिली वेळ नाही. याआधी कंगनाने वेळोवेळी बॉलिवूडमधली घराणेशाही आणि गटबाजीविरोधत वक्तव्य केलं आहे.