आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते. समाजात घडलेल्या कोणत्याही घटनेवर ती कायम उघडपणे व्यक्त होते. सध्या जेएनयूची माजी विद्यार्थी नेता असणाऱ्या शेहला रशीद यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप केले आहे. हे प्रकरण सध्या चर्चेत असतानाच कंगनाने त्याविषयी ट्विट करत तिचं मत मांडलं आहे.

“देशद्रोह केल्यावर तुम्हाला संपत्ती, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, साथी सगळं काही मिळेल. पण जर तुम्ही देशप्रेमी असाल तर तुमच्या वाट्याला शत्रू, संघर्ष,पूर्वजांच्या सभ्यतेचा संघर्ष तुम्हाला वारसाहक्काने मिळेल. तुमचं आयुष्य आहे तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे, समजूतदारपणे आयुष्य जगायचं की मुर्खासारखं?. मी तर जन्मत:चं मूर्ख आहे”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

कंगनाने या पोस्टसोबत शेहला रशीद यांच्या वडिलांचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचे वडील अब्दुल रशिद शोरा हे आपल्या मुलीचा देशाविरोधातील कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- “माझ्या मुलीचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग”; JNU च्या माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदच्या वडिलांचा आरोप

अब्दुल रशिद शोरा यांचा दावा

दिल्लीमधील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापीठाची म्हणजेच जेएनयूची माजी विद्यार्थी नेता असणाऱ्या शेहला रशीद यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप केले आहे. शेहला यांचे वडील अब्दुल रशिद शोरा यांनी आपल्या मुलीचा देशाविरोधातील कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा केला आहे. तसेच शेहलापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही शोरा यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील पत्र शोरा यांना जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आपली पत्नी जुबैदा, मोठी मुलगी आसमा रशीद आणि पोलीस खात्यामधील एक कर्मचारीही शेहलासोबत या देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप या पत्रामध्ये शोरा यांनी केला आहे. तसेच जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट पक्षामध्ये सहभागी होण्यापूर्वी शेहलाने एका उद्योजकांकडून तीन कोटी घेतल्याचा दावाही शोरा यांनी केला आहे.

शेहला यांनी फेटाळले वडिलांचे आरोप

शेहला यांनी आपल्या वडिलांनी पाठवलेल्या या पत्रासंदर्भातील वृत्त समोर आल्यानंतर सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शेहला यांनी एक पोस्ट ट्विटवरुन शेअर केली आहे. “तुमच्यापैकी अनेकांनी माझ्या वडिलांनी माझ्याबरोबर माझी आणि बहिणीवर केलेल्या आरोपांचा व्हिडीओ पाहिला असेल. अगदी थोड्यात सांगायचं झाल्यास माझे वडील म्हणजे महिलांना मारहाण करणारे, शिव्या देणारे आणि निराश व्यक्ती आहे. आम्ही त्यांच्या या वागण्याविरोधात आवाज उठवला आणि त्यांनी नंतर प्रसिद्धीसाठी हा स्टंट केला आहे,” असं शेहला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.