अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाच्या अभिनयाची कधीही न पाहिलेली बाजू प्रेक्षकांना अनुभवता आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजल्यानंतर कंगनाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून ती लवकरच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित ‘जया’ या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या

चित्रपटासाठी कंगना जोरदार तयारी करत आहे. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगना प्रचंड मेहनत घेत असून तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागत आहे. या मेकअपचे काही फोटो कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये कंगनाला ओळखणं अशक्य असल्याचं स्पष्टपणे जाणवतं.

जयललिता यांच्या बायोपिकमध्ये कंगना जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तिला जयललिता यांचा लूक साकारण्यासाठी प्रोस्थेटिक मेकअप करावा लागत आहे. काही दिवसापूर्वीच लूक टेस्ट करण्यासाठी ती लॉस एंजलिससाठी रवाना झाली होती.

वाचा: Happy Birthday Mahesh Bhatt : ‘या’ अभिनेत्रीसाठी महेश भट्टने बदलला होता धर्म

कंगनाला कराव्या लागत असलेल्या प्रोस्थेटिक मेकअपमुळे तिला श्वास घेण्यासही अडथळा येत असल्याचं दिसून येत आहे. कंगनाच्या या लूकची टेस्ट हॉलिवूडचे मेकअप आर्टिस्ट जॅसन कोलिंस यांनी केली असून त्यांनी आतापर्यंत ‘कॅप्टन मार्वेल’ आणि ‘ब्लेड रनर २०४९’ या चित्रपटांसाठी काम केलं आहे.
दरम्यान, हॉलिवूडप्रमाणेच आता बॉलिवूडमध्येही प्रोस्थेटिक मेकअपती संकल्पना रुजू लागली आहे. यापूर्वी ‘पा’, ‘102 नॉट आउट’, ‘बदला’, 2.0 आणि ‘फॅन’ या चित्रपटांमध्ये प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला आहे.

जयललिता यांचा बायोपिक तामिळ, तेलुगु आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या बायोपिकसाठी कंगनाने २० कोटी रुपयांचं मानधन स्वीकारल्याचं सांगण्यात येत आहे.