बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चांडेल विरोधात शनिवारी मुंबईमधील वांद्रे पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला. कंगना आणि रंगोली ट्विटरद्वारे, मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

कंगनाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘कोण कोण नवरात्रीचे उपवास करतं? मी देखील उपवास केला आहे आणि आज नवरात्र उत्सव साजरा करतानाचे काही फोटो काढले. दरम्यान माझ्या विरोधात आणखी एक FIR नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्या व्यतिरिक्त काही दिसत नाही. माझी जास्त आठवण काढू नका, मी लवकरच येणार आहे’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले आहे.

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.