‘जजमेंटल है क्या’ या चित्रटाच्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री कंगना रणौत आणि काही पत्रकारांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर हा वाद चांगलाच पेटला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यानंतर आता कंगनाच्या वकिलांनी या पत्रकारांविरोधात मानहानीची कायदेशीर नोटीस काढली आहे. या नोटीसमध्ये, काही पत्रकार त्यांच्या जर्नलिस्टिक नॉर्मसचं उल्लंघन करत आहेत, असे आरोप करण्यात आले आहेत.

अभिनेत्री कंगना रणौत आणि वादविवाद यांचं नातं काही नवीन नाही. बॉलिवूड कलाकारांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या कंगनाच्या निशाण्यावर आता पत्रकार असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये कंगनाची एका पत्रकारासोबत शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर हे प्रकरण कलाविश्वाप्रमाणेच प्रसारमाध्यमांमध्येही चांगलचं गाजलं. कंगनाच्या या वर्तनामुळे चित्रपटाचे निर्माते बालाजी फिल्मने एक पत्रक प्रसिद्ध करत माफी मागितली. मात्र कंगना आणि तिच्या बहिणीने रंगोलीने आक्रमक भूमिका घेतली आहे. रंगोलीने ट्विटरच्या माध्यमातून या पत्रकारांना देशद्रोही म्हटलं होतं. तर आता कंगनाच्या वकिलांनी या पत्रकारांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.


‘काही पत्रकार त्याच्या जर्नलिस्टिक नॉर्मसचं उल्लंघन करत आहेत, गुन्हेगारीची कृत्य करत आहेत. तसेच हे पत्रकार माझ्या क्लायंटची सार्वजनिक ठिकणी मानहानी करत असून तिला त्रास देत आहेत’, असं म्हणत कंगनाच्या वकिलांनी ‘Entertainment Journalist Guild of India’  यांना नोटीस पाठविली आहे.

पुढे त्यांनी लिहिलं आहे, ‘काही असे पत्रकार आहेत, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत आहेत. मात्र त्यांच्या अशा वर्तनामुळे अन्य लोकांची प्रतिमा खराब होत आहे’. तसेच ‘Entertainment Journalist Guild of India’ रजिस्टर नसल्याचं म्हणतं त्यांच्या नोटीसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

दरम्यान, ‘जजमेंटल है क्या’च्या पत्रकार परिषदेमध्ये कंगनाचा काही कारणामुळे एका पत्रकाराशी वाद झाला होता. या वादानंतर ‘Entertainment Journalist Guild of India’ने या प्रकरणी कंगनाने पत्रकारांची माफी मागावी असं म्हटलं होतं. कंगनाने असं न केल्यास तिचा चित्रपट बॉयकॉट केला जाईल असं म्हटलं होतं. त्यानंतर निर्माती एकता कपूरनं यावर माफी मागितली होती. मात्र कंगनाने मला खुशाल बॅन करा, मी अशा धमक्यांना घाबरत नाही असं म्हटलं होतं.