बॉलिवूडमध्ये अभिनेते आणि अभिनेत्रींच्या वाट्याला येणाऱ्या यशाचं समीकरण आणि त्याचं महत्त्व प्रत्येक कलाकाराच्या दृष्टीने वेगळे असते. बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या आणि सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कंगना रणौत. आपल्या वाट्याला आलेल्या यशाविषयी बोलताना कंगणा रणौत म्हणाली की, यश हे कोणाच्याही दबावामुळे मिळत नाही. त्याचप्रमाणे अयशस्वी चित्रपट तुमच्या विश्वासार्हतेचे प्रमाण ठरवू शकत नाहीत.
एका मुलाखतीदरम्यान कंगनाने तिचे विचार मांडले आहेत. ‘कोणतेही नवे काम हाती घेताना किंवा नवा चित्रपट करताना मी हा विचार नाही करत की त्यामुळे मला त्याचा किती फायदा होईल. किंवा मला किती प्रसिद्धी मिळेल. मी माझ्या कामासाठी कोणतेही प्रमाण ठेवलेले नाही. मला कोणते काम करायचे आहे आणि मला कुठवर जायचे आहे, हे मी काहीच ठरवलेले नाही. किंबहुना अशा प्रकारचा कोणताही दबाव मी स्वत:वर ठेवलेला नाही. मला फक्त जीवनात पुढे जायचे आहे. माझ्या मते बॉलिवूडमधल्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी मीच एक अशी अभिनेत्री आहे जिने ‘बी-ग्रेड’ चित्रपटांमध्ये काम केले आहे’, असे कंगना म्हणाली.
‘कोणताही चित्रपट अथवा नवे प्रोजेक्ट करतेवेळी माझा स्तर किती उंचावेल याचा मी अजिबात विचार करत नाही. कित्येक चित्रपटांच्या असफलतेनंतरही तुम्ही एक उत्तम कलाकार असता. असेच काहीसे माझ्यासोबत झाले आहे’, असेही कंगनाने स्पष्ट केले. उत्तर भारतातील मनाली येथून बॉलिवूडमध्ये आलेल्या कंगनाचे चित्रपटसृष्टीसोबत याआधी कोणत्याही प्रकारचे नाते नव्हते. पण तरीही कंगनाने तिची स्वत:ची ओळख बनवण्यात यश मिळवले होते. ‘गॅगस्टर’, ‘वो लम्हे’, लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनु वेड्स मनु’, ‘फॅशन’, ‘क्वीन’ यांसारख्या विविध धाटणीच्या चित्रपटांतून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य प्रेक्षकांसमोर सादर केले आहे. कंगनाला तिच्या अभिनयासाठी केंद्रशासनानेही पुरस्कार देऊन गौरविले आहे. सध्या बॉलिवूडची ही ‘क्वीन’ हंसल मेहता यांच्या ‘सिमरन’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. त्यासाठी ती विविध कार्यशाळांनाही हजेरी लावत आहे. तसेच ‘रंगून’ या चित्रपटातूनही ती झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. पुढील वर्षी २४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 6:45 pm