मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. या कारवाईमुळे कंगना विरुद्ध ठाकरे सरकार अशा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या वादात सूरतमधील काही व्यापारांनी कंगनाला पाठिंबा देत तिच्या नावाची साडी बाजार आणली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे कंगनाला पाठिंबा देणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर ही साडी खरेदी करत आहेत.

अवश्य पाहा – “त्यावेळी मी ड्रग्सचं व्यसन करत होते”; कंगना रणौतचा व्हिडीओ व्हायरल

सुरतमधील छोटूभाई आणि रजत डावर नावाच्या दोन व्यापाऱ्यांनी कंगनाला पाठिंबा देण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटातील फोटो साडीवर प्रिंट केला आहे. तसेच या फोटोवर “झांसीची राणी, माझा कंगना रणौतला पाठिंबा, कंगनाला मानाचा मुजरा” अशा आशयाचा मजकूर देखील लिहिलेला आहे. या साडीच्या माध्यमातून सुरतमधील त्या दोन व्यापाऱ्यांनी कंगनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी बाजारात आणलेल्या या नव्या साड्या सध्या महिला ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अवश्य पाहा – “मी ड्रग्स घेत नाही”; ट्रोल होताच रियाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रीची माघार

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत आहे. ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांना कंगनाला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती. यावर कंगनानं ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, मी मराठा आहे, काय उखडायचं ते उखडा’, असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं. दरम्यान कंगना आता मुंबईत दाखल झाली आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबई विमानताळवर कंगना विरोधात घोषणाबाजी देखील केली होती.