गेल्या आठवड्यात अभिनेत्री कंगना रणौत हिचा ‘मणिकर्णिका’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कंगनाचा अभिनय आणि दिग्दर्शनाचं भरभरून कौतुक होत आहे. मात्र यश साजरं करण्याची कंगनाला साधी संधीही मिळाली नाही. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांतच यशाच्या श्रेयावरून वाद सुरू झाला आहे. कंगानाला श्रेय लाटण्याची सवय आहे तिनं मणिकर्णिकाचं ७० % दिग्दर्शन केलंय हा दावा खोटा आहे असे अनेक आरोप पटकथालेखक अपूर्व आणि दिग्दर्शक क्रिश यानं केले आहेत. या वादावर कंगनानं तूर्त तरी मौन धारण करणं पसंत केलं आहे. मात्र कंगनाची पाठराखण करण्यासाठी नेहमीप्रमाणे तिची बहिण रंगोली पुढे आली आहे.

‘तुम्ही संपूर्ण मणिकर्णिका दिग्दर्शित केला असं आम्ही यापुढे मानून चालतो. आता कृपा करून शांत बसा. कंगना या चित्रपटाचा खरा चेहरा आहे. तिला यशाचा आनंद घेऊ द्या. तुम्ही तिला कृपा करून एकटं सोडा’ असं म्हणत दिग्दर्शक क्रिशला रंगोलीनं सुनावलं आहे.

‘मणिकर्णिका’च्या ७० % भागाचं आपण दिग्दर्शन केल्याचा दावा कंगनानं केला आहे. मात्र या चित्रपटाचा सहदिग्दर्शक क्रिश यानं कंगनाचा दावा खोडून काढला आहे. तिनं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या अवाजवी हस्तक्षेपाला कंटाळूनच मी चित्रपट सोडला. सुदैवानं कंगाननं ‘मणिकर्णिका’ चित्रपटाची वाट लावली नाही हे नशीब असं क्रिश म्हणाला होता. यावर कंगनाची बहिण रंगोलीनं सडेतोड उत्तर देत क्रिशला जशास तसे उत्तर दिले आहे.