मुस्लीम मुलाशी प्रेमसंबंध असल्याने हृतिकची बहीण सुनैना रोशन हिला कुटुंबीयांकडून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक आरोप अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चांडेलने केला आहे. सुनैना ही सारखी कंगनाला फोन करून मदतीसाठी विनवणी करत असल्याचंही तिने म्हटलं आहे. रंगोलीने ट्विट करत ही संपूर्ण माहिती दिली.

‘सुनैना रोशन कंगनाकडे मदत मागत आहे. दिल्लीतल्या एका मुस्लीम तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याने रोशन कुटुंबीयांकडून तिला त्रास दिला जात आहे. गेल्या आठवड्यात तिला महिला पोलिसाकडून मारण्यात आलं. तिच्या वडिलांनीही तिच्यावर हात उचलला होता. तिचा भाऊ तिला कारागृहात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सुनैना सतत रडत कंगनाला मदतीसाठी फोन करत आहे. कंगनाने आता तिचा नंबर ब्लॉक केला आहे पण आम्हाला तिच्या सुरक्षिततेची काळजी आहे. प्रत्येकाला प्रेम करण्याचा हक्क आहे. माझ्या ट्विटमुळे तरी रोशन कुटुंबीय तिला त्रास देणं बंद करतील अशी अपेक्षा आहे. सुनैनाचे सगळे मेसेज व फोन कॉल्स मी रेकॉर्ड करून ठेवले आहेत,’ असं ट्विट रंगोलीने केलं आहे.

सुनैनाने नुकतंच ट्विट करत ‘माझा कंगनाला पूर्ण पाठिंबा आहे,’ असं म्हटलं आहे. हृतिक व कंगनाच्या प्रकरणानंतर कंगनाची बाजू घेता न आल्याबद्दल सुनैनाने माफीसुद्धा मागितली होती. तर दुसरीकडे सुनैना दुभंगलेलं व्यक्तीमत्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांत होत्या. सुनैनाने या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्टदेखील केलं होतं. आता या संपूर्ण प्रकरणात हृतिक रोशन किंवा रोशन कुटुंबीय काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.