अभिनेत्री कंगना रणौत ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा कंगना तिचा आगामी सिनेमा ‘थलायवी’ मुळे चर्चेत आली आहे. 23 एप्रिलला कंगनाचा ‘थलायवी’ सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आणि लॉकडाउनमुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. ‘थलायवी’ सिनेमाप्रमाणे अनेक सिनेमांचं प्रदर्शन रद्द करण्यात आलं आहे. तर काही निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच ‘थलायवी’ सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

कंगनाने मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘थलायवी’ सिनेमा आधी चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार असून त्यानंतर तो ओटीटीवर उपलब्ध होईल हे तिने स्पष्ट केलं आहे. शिवाय हे सांगतना कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील काही निर्मात्यांवर आणि मीडियावर निशाणा साधला आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहली आहे. यात ती म्हणाली, ” तमिळ भाषेतील ‘थलायवी’ सिनेमाचे डिजिटल हक्क अ‍ॅमेझॉन प्राइमकडे आहेत. तर हिंदी भाषेतील सिनेमाचे हक्क नेटफ्लिक्सकडे आहेत. मात्र हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी दोन्ही कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित करू शकत नाहित. ” हे सांगतानाच कंगनाने मूव्हि माफियांवर टीका केली आहे. ” मूव्हि माफियांकडून होणाऱ्या खोड्या प्रचाराकडे कृपा करून दूर्लक्ष करा. ‘थलायवी’ सिनेमा हा चित्रपटगृहातील प्रदर्शनास पात्र आहे आणि त्यामुळेच निर्माते निश्चिंत आहेत. खोटा प्रचार करणाऱ्या माध्यमांवर कडक कारवाई केली जाईल.” अशी रोखठोक प्रतिक्रिया कंगनाने अफवा पसरवणाऱ्यांना दिली आहे.

“हे बघा पळपुटे” ; मालदीव ट्रीपमुळे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ट्रोल

यावेळी कंगनाने “बॉलिवूडमधील माफिया गँग अफवा पसरवत असल्याचंही म्हंटलं आहे.”

या सिनेमात कंगना दिवंगत अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘थलायवी’ या सिनेमातील पहिलं गाणं हे २ एप्रिल रोजी प्रदर्शित झालं. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक ए.एल. विजय आहेत.