सध्या देशात पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने पारित केलेल्या तीन शेतीविषयक कायद्यांविरोधात व्यापक शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून या आंदोलनामागे विरोधकांचाच हात असल्याचा आरोप केला जातोय. याच मुद्द्यावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने अनेक ट्विट केली. त्यातील काही ट्विट वादग्रस्त ठरल्याने तिच्यावर टीकेचा भडीमार झाला. असे असतानाही शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत कंगनाने आता एक नवं ट्विट केलं आहे.

कंगनाने कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधत एक ट्विट केलं आहे. “अखंड भारतावर प्रेम करणारे, भारत देशाचे तुकडे होऊ नयेत असं वाटणारे… अशा लोकांना सुप्रभात! कृषी कायदा समजून घेणारे आणि या कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत आणि शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत. त्यामुळे ढगांपासून सावध राहा”, असं कंगना ट्विटच्या माध्यमातून म्हणाली आहे.

कंगनाने या ट्विटला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अवघ्या ५ तासांत या ट्विट दोन हजारांहून अधिक वेळा रिट्विट केलं गेलं असून ३० हजारांहून जास्त लोकांनी ट्विट लाईक केलं आहे. या ट्विटवर सुमारे दोन हजार कमेंट्सदेखील आहेत. यात काहींनी कंगनाच्या विचारांना पाठिंबा दर्शवला आहे तर काहींनी तिला विरोध केला आहे.