अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर कलाविश्वात गेल्या अनेक दिवसांपासून घराणेशाही या मुद्द्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री कंगना रणौतने या प्रकरणी अनेक दिग्गज कलाकारांवर निशाणा साधला आहे. यामध्ये तिने अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, महेश भट्ट यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. त्यातच आता तिने पुन्हा एकदा करण जोहरवर सडकून टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत करण्यात आली आहे. हा चित्रपट राष्ट्रभक्तीवर आधारित आहे. मात्र त्यात देशभक्ती कुठेच दिसून येत नाही, असं कंगना म्हणाली आहे. एक शायरी शेअर करत तिने ही टीका केली आहे.

“केवळ पैसे मिळावेत याच उद्देशाने ते भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित चित्रपटाची कायम निर्मिती करतात. मात्र, त्यात सुद्धा एखाद्या भारतीय व्यक्तीलाच खलनायक म्हणून दाखवलं जातं. करण जोहरला हे कधी कळणार की एक सैनिक हा कायम सैनिकच असतो”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, कंगना अनेकदा सोशल मीडियावर उघडपणे व्यक्त होत असते. आतापर्यंत अनेक कारणांसाठी तिने करण जोहरवर सडकून टीका केली आहे. इतकंच नाही तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी तिने करणवर घराणेशाहीचा आरोपही केला आहे.