अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयावर अभिनेत्री कंगान रणौतने आनंद व्यक्त केला. त्यानंतर कंगनाने टि्वटरवरुन पुन्हा एकदा अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे. ‘माझ्या मागे बोला, नैराश्याचा धंदा करणाऱ्यांना जनतेने आरसा दाखवला’ असे टि्वट करत कंगनाने दीपिकाला टोला लगावला.

दीपिका पदुकोणनेही नैराश्याचा सामना केला आहे. ते अनुभव दीपिकाने अनेकदा सर्वांसोबत शेअर केले आहेत. मानसिक आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दीपिका सोशल मीडियाचाही वापर करते. सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केली, तेव्हा तो सुद्धा नैराश्यामध्ये होता असे म्हटले जाते. सुशांतच्या मृत्यूनंतर दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नैराश्यासंबंधी काही पोस्ट केल्या होत्या.

सुशांतच्या मृत्यूनंतर दीपिकाने एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने ‘माध्यमांतील माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, गुन्हेगार गुन्हा करतात. लोक आत्महत्या करत नाहीत तर ते आत्महत्येने मरतात. अत्यंत गंभीर क्लेशातून ही कृती घडते’, असं तिने लिहिलं. त्याचसोबत तिने मानसिक आरोग्याचं महत्त्व अधोरेखित करत एक ट्विट केलं. ‘तुम्ही बोला, व्यक्त व्हा, मदत मागा, संवाद साधा. तुम्ही एकटे नाही आहात. आपण सर्वजण या प्रवासात एकमेकांसोबत आहोत आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे उमेद आहे’, असं ती म्हणाली.

स्वत: नैरैाश्याचा सामना केलेला असल्यामुळे दीपिकाने ‘लाइव्ह लव्ह लाफ’ ही संस्था स्थापन केली आहे. मानसिक आजाराचा सामना करणाऱ्यांसाठी ही संस्था काम करते. दीपिका पदुकोण नैराश्याचा व्यवसाय करते असे कंगनाचे म्हणणे आहे. मागच्या महिन्यातही तिने यावरुन दीपिकाला लक्ष्य केले होते. नैराश्याचा व्यवसाय चालवणाऱ्यांनाही तुरुंगात टाकलं पाहिजे’, असं ट्विट टीम कंगना रणौतच्या अकाऊंटवर करण्यात आलं होंत.