बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. आताही कंगनाने महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडिंवर आपलं मत मांडलं आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल राजीनामा दिला. या घटनेवर ट्वीट करत कंगनाने महाराष्ट्र सरकारवर त्यातही खास करून अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. एका नेटकऱ्याने कंगना आणि अनिल देशमुख यांना टॅग करत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत कंगना म्हणते की, “आज माझं घर तुटलंय उद्या तुझा अहंकार तुटेल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी एकसारखं फिरत नाही.” ते ट्विट रिट्विट करत कंगना तिच्या स्टाईलमध्ये टीका केली आहे. कंगना म्हणाली,”जे साधूंची हत्या करतात आणि एका स्त्रीचा अपमान करतात त्यांचा सर्वनाश निश्चित आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पाहत राहा अजून काय काय होतंय.”

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का दिला असून सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी कंगनाचे मुंबईतील ऑफिस तोडल्याने कंगनाने अनिल देशमुख आणि मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.