कंगना रणौतची प्रमुख भूमिका असलेला ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी ‘ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गाथा या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातून कंगना दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण करत आहे. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ कंगना ‘मणिकर्णिका’साठी मेहनत घेत आहे, म्हणूनच चित्रपटाच्या यशासाठी कंगनानं कुलदैवतेला साकडं घातलं आहे.

कंगना सध्या तिच्या मुळ गावी हिमाचल प्रदेशमध्ये आहे. यावेळी कुलदैवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी कंगना तिच्या कुटुंबीयांसमवेत महिषासुरमर्दिनीच्या मंदिरात पोहोचली. तिथे तिनं देवीचे आशीर्वादही घेतले. कंगनानं हे मंदिर बांधलं आहे. तीन वर्षांपासून या मंदिराचं बांधकाम सुरू होतं. लवकरच कंगना चित्रपटाच्या प्रमोशनला जोरदार सुरूवात करणार आहे. पण त्याआधी तिनं देवीचे आशीर्वाद घेत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे.

तर दुसरीकडे  करणीसेनेच्या आक्षेपामुळे हा चित्रपट विवादात सापडला आहे. या चित्रपटातील काही दृश्य ही राणी लक्ष्मीबाई यांची प्रतिमा मलिन करणारी आहेत असा आरोप करणी सेनेचा होता जर चित्रपटात अशी आक्षेपार्ह दृश्य आढळली तर याचे परिणाम वाईट होतील असा धमकीवजा इशारा करणीसेनेच्या महाराष्ट्र विभागानं चित्रपटाच्या निर्मात्यांना दिला होता. यावर कंगनानं जशास तसे उत्तर दिलं आहे.

२५ जानेवारीला ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित होत आहे. तत्पुर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी कंगनानं ‘मणिकर्णिका’च्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं आहे. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात पार पडणाऱ्या या स्पेशल स्क्रिनिंगसाठी कंगना आणि चित्रपटाची टीम स्वत: उपस्थित राहणार आहे.