देशद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर शुक्रवारी ( ८ जानेवारी) अभिनेत्री कंगना रणौत आणि बहीण रंगोली चंदेल यांचा वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यात आला. जवळपास २ तास कंगना व रंगोलीची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये माझ्या ट्विटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील असं मला वाटत नाही, असं उत्तर थेट पोलिसांना दिलं आहे. तसंच चौकशी झाल्यानंतर तिने एक ट्विट करत तिचा संताप व्यक्त केला आहे.

“जर तुम्ही देशाविरोधात असाल तर तुम्हाला खूप पाठिंबा, काम करण्याची संधी, पुरस्कार आणि कौतूक मिळेल. पण जर तुम्ही राष्ट्रवादी असाल तर तुम्हाला एकट्यालाच उभं रहावं लागेल. स्वत:च स्वत:च्या मदतीचा स्त्रोत व्हा”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, वांद्रे पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी जाण्यापूर्वी कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्येदेखील तिने तिचा राग व्यक्त केला होता. “माझं मानसिक, भावनिक व आता शारीरिक शोषण का केलं जात आहे? मला देशाकडून याचं उत्तर हवंय. मी तुमच्यासाठी उभं राहिले होते. आता तुम्ही माझ्यासाठी उभं रहा”, असं म्हणत कंगनाने व्हिडीओ शेअर केला होता.

  वाचा : जगन शक्तींच्या मानधनात वाढ; अक्षय कुमारसोबत काम करण्यासाठी घेतली इतकी फी

काय आहे प्रकरण?

देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे कंगनाविरोधात दाखल करण्यात आले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना व रंगोली सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त झाल्या होत्या. मात्र, यापैकी कंगनाच्या एका ट्विटवर साहिल नामक व्यक्तीने आक्षेप घेत वांद्रे न्यायालयात कंगना आणि रंगोली विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर कंगनावर देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांअंतर्गंत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना जबाब नोंदविण्यासाठी नोटीस पाठविली होती. मात्र, कंगनाने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र, आज कंगना स्वत: हून चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे.