भारत पाकिस्तानला ४.५ कोटी लसींचा पुरवठा करणार आहे. United GAVI alliance अंतर्गत भारताकडून हा लसींचा पुरवठा होणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियमन आणि समन्वय फेडरल सेक्रेटरी आमीर अशरफ ख्वाजा यांनी सार्वजनिक लेखा समितीला सांगितले असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असेत. नुकताच भारत पाकिस्तानला ४.५ कोटी लसींचा पुरवठा करणार असल्याचे समोर येताच कंगनाने केलेले ट्वीट चर्चेत आहे. तिने आता पाकिस्तानमध्ये देखील भाजपाचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे.

‘म्हणजे मोदीजी म्हणत आहेत की तो (पाकिस्तान) देखील भारताचाच वेगळा झालेला भाग आहे. तिथे देखील लवकरच भाजपाचे सरकार असणार… दहशतवादी माझे नाहीत पण तेथील लोकं तर माझेच आहेत…हा हा हा.. जबरदस्त’ अशा अशायचे ट्वीट कंगनाने केले आहे.

ख्वाजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, GAVI करारांतर्गत ४.५ कोटी लसीचे डोस मिळणार असून यामधील १.६ कोटी डोस हे जून महिन्यापर्यंत उपलब्ध होतील. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, समितीला माहिती देत असताना सिनेटर मुशहिद हुसैन सय्यद यांना लसीचे डोस कुठून येत आहेत यासंबंधी विचारणा करण्यात आली. यावेळी आरोग्य सचिवांनी पाकिस्तानला सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणारे लसीचे डोस मिळणार असल्याची माहिती दिली.