X

कलम ३७० रद्द करा, कंगनाची पंतप्रधान मोदींकडे मागणी

जम्मू- काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची मागणी

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. या भ्याड आत्मघातकी हल्ल्याची निंदा करणाऱ्या अभिनेत्री कंगाना रणौत हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जम्मू- काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली आहे.

दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ‘लोकांचा राग हा साहजिक आहे, त्यामुळे आता समस्येवर ठोस तोडगा काढलाच पाहिजे’, असं मत कंगानानं व्यक्त केलं आहे. नॅशनल रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं जम्मू कश्मीरला दिलेल्या विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. ‘भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटली आहे त्यामुळे आपण कोणत्या बाजूनं आहोत याबद्दल कोणत्याही राज्याच्या मनात इतका संभ्रम निर्माण व्हायला नको’ असं कंगनानं मुलाखतीत म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये काम करण्यापासून घालण्यात आलेल्या बंदीवरदेखील कंगना व्यक्त झाली आहे. पाकिस्तानी चाहत्यांकडून नेहमीच भारतीय कलाकारांवर प्रेमाचा वर्षाव होतो पण तरीदेखील आता दोघांमध्ये सीमा आखण्याची वेळ आली आहे. भारतीय लोक आपल्या देशासाठी, जवानांसाठी कसे एकत्र येतात हे पाकिस्ताननं शिकलं पाहिजे असंही कंगना म्हणाली.