बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक मतं मांडते. अनेकदा या बिनधास्त प्रतिक्रियांमुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. या पार्श्वभूमीवर अलिकडेच ट्विटरवर ‘सस्पेंड टीम कंगना’ हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. या हॅशटॅगला पाठिंबा देत अभिनेत्री कुब्रा सैत हिने कंगनावर निशाणा साधला. मात्र कंगनाची टीम देखील शांत बसली नाही, तिने कुब्राच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – सुशांतनं पत्ता म्हणून दिलेला फ्लॅट आठ वर्षांपूर्वीच रियाच्या वडिलांनी घेतला होता विकत

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: संजय राऊत यांच्यावर सुशांतचं कुटुंब ठोकणार मानहानीचा दावा

काय म्हणाली कुब्रा?

सेक्रेड गेम्स या लोकप्रिय वेब सीरिजमधून नावारुपास आलेली कुब्रा सैत हिने कंगनाशी पंगा घेतला आहे. “#सस्पेंड टीम कंगना या हॅशटॅगचं मी समर्थन करते. ट्विटरने या ट्रेंडकडे लक्ष द्यावं. आजचा दिवस सोडला तर या अकाउंटवरुन कधीही सकारात्मक ट्विट केलं गेलेलं नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन कुब्राने कंगनावर निशाणा साधला होता. तिच्या या ट्विटवर कंगनाच्या टीमने देखील जोरदार उत्तर दिलं आहे. “प्रिय कुब्रा सैत, कंगनाने तुझं काय नुकसान केलं ज्यामुळे तू तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात आवाज उठवत आहेस. तूझी नेमकी समस्या काय आहे? तुला खरंच कंगनाविरोधात बोलायचंय की कोणाला तरी खुश करायचंय?” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाच्या टीमने कुब्राला प्रत्युत्तर दिलं. हे दोन्ही ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.