बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद काही शमण्याचे नाव घेत नाही. आपल्या नावाने अज्ञाताने बनावट ईमेल अकाऊंट तयार केले असून, त्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांची फसवणूक करतो आहे. याच ईमेलमधून अभिनेत्री कंगना राणावत हिचीदेखील फसवणूक केली जात असल्याचे ह्रतिक रोशनचे म्हणणे आहे. या प्रकरणात साक्षीदार म्हणून येत्या ३० एप्रिलला कंगनाचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडून हा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
काल म्हणजेच १८ एप्रिललाच सायबर क्राईम विभागाचे अधिकारी कंगनाच्या घरी जाऊन तिचा जबाब नोंदविणार होते. पण कंगना जबाब नोंदविण्यासाठी उपलब्ध नसल्याचे तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी सांगितल्यानंतर आता ३० एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
हृतिकने माझे खासगी फोटो आणि इमेल तिस-याच व्यक्तीला पाठवल्याने त्याला अटक करणे हे पोलिसांचे काम आहे. तिच्या वकिलांनीही मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून हृतिक रोशनला अटक करण्याची मागणी केलीयं. कंगनाने त्याच्यावर काही खाजगी मेल आणि फोटो प्रसिद्ध केल्याचा ठपका ठेवला आहे. दरम्यान, आपल्या नावाने अज्ञाताने बनावट ईमेल अकाऊंट तयार करून त्यातून ही फसवणूक केली जात असल्याचे ह्रतिक रोशनचे म्हणणे आहे. याप्रकरणी डिसेंबर २०१४ मध्येच त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ह्रतिकचे वकील दिपेश मेहता यांनी पोलिसांकडे विविध पुरावेही सादर केले आहेत.