23 October 2018

News Flash

मनालीमधील कंगनाच्या नव्या घराची किंमत माहितीये का?

बॉलिवूडच्या 'क्वीन'चे हे स्वप्नवत घर साकारण्यासाठी तब्बल चार वर्षे लागली.

कंगना रणौत

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. पण, सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिने मनालीत बांधलेल्या नव्या घराचीच अधिक चर्चा असल्याचे दिसते. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणाऱ्या कंगनाने ‘क्वीन’च्या (२०१४) यशानंतर मनालीत जवळपास १० कोटींना ही जागा घेतली होती. त्यानंतर या जागेवर तिने स्वतःचे घर बांधण्याचे ठरवले. बॉलिवूडच्या ‘क्वीन’चे हे स्वप्नवत घर साकारण्यासाठी तब्बल चार वर्षे लागली.

वाचा : हनीमूनला गेलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावे लागले एअरलिफ्ट!

सुत्रांच्या माहितीनुसार, या घरात एकूण आठ बेडरुम असून, प्रत्येक रुममधून पर्वतरांगांचे नयनरम्य दृश्य दिसते. तसेच प्रत्येक बेडरुमबाहेर बाल्कनीसुद्धा आहे. घराच्या छतावर काच असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये घरात पुरेपूर सूर्यप्रकाश येण्याची सोय करण्यात आली आहे. घराचे काम सुरु असताना कंगना स्वतः मनालीत वरचेवर जाऊन कामाची स्थिती पाहत होती. दोन दिवसांपूर्वीच कंगना करणच्या रिअॅलिटी शोला हजेरी लावण्यासाठी मुंबईत परतली.

वाचा : आणखी एक मराठी सेलिब्रिटी जोडी अडकली विवाहबंधनात

या सुंदर घराला बांधण्यासाठी कंगनाला जवळपास २० कोटींपेक्षा जास्त खर्च आल्याचे कळते. मुंबईतील श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींची घरे डिझाइन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शबनम गुप्ता हिने कंगनाचे घर सजवले आहे. या संपूर्ण घराला विंटेज युरोपियन टच देण्यात आला आहे. शबनमने कंगनाचे घर सजवण्यासाठी हातमागावरील उत्पादनांचा अधिकाधिक वापर केला आहे. तसेच, कंगनानेही तेथील स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करत आपल्या घराचे सौंदर्य वाढवले आहे. मुळची हिमाचल प्रदेशची असलेली कंगना तिच्या फिटनेसबद्दलही बरीच जागरुक असते. त्यामुळे तिने घरात जीम आणि वेगळ्या योग रुमसाठी राखीव जागा ठेवली आहे.

First Published on January 12, 2018 12:11 pm

Web Title: kangana ranauts manali house price