News Flash

तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांत तफावत

देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी कंगनाचा उच्च न्यायालयात दावा

तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांत तफावत
(संग्रहित छायाचित्र)

अभिनेत्री कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश देताना आधार घेण्यात आलेली कागदपत्रे वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांकडून मागवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मूळ तक्रारदाराने महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर आणि उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत असल्याची बाब कंगनाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने हे आदेश दिले.

देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळी महानगरदंडाधिकाऱ्यांनी कंगनावर घाईने आणि कुठलाही सारासार विचार न करता गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप कंगनाच्या वकिलांनी केला. अशी तक्रार दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया महानगरदंडाधिकाऱ्यांकडे अवलंबण्यात आली नसल्याचा दावाही केला गेला.

कायद्यानुसार तक्रारीचे पत्र पहिल्यांदा संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाकडे पाठवले जाते. दोन आठवडय़ांत त्यावर काहीच प्रतिसाद आला नाही, तर तक्रारीचे पत्र क्षेत्रीय उपायुक्तांना पाठवले जाते. त्यानंतर महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाते. मात्र या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला पत्र पाठवल्यानंतर त्यावर प्रतिसाद येण्यापूर्वीच महानगरदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी न्यायालयाला सांगितले. तर मूळ तक्रारदार मुनव्वर अली सय्यद यांनी क्षेत्रीय उपायुक्तांनाही पत्र पाठवल्याचा आणि तारखेमध्ये चूक झाल्याचा दावा तक्रारदाराचे वकील रिझवान र्मचट यांनी केला.

..तोपर्यंत संरक्षण कायम

कंगनाच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाची न्यायालयाने दखल घेतली. महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर आणि उच्च न्यायालयात मूळ तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत असल्याचा मुद्दा कंगनाच्या वकिलांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महानगरदंडाधिकाऱ्यांकडे सादर केलेली कागदपत्रे पाहायची असल्याचे सांगत वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांकडून ती मागण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच प्रकरणाची पुढील सुनावणी २२ मार्च रोजी ठेवली, तोपर्यंत कंगनाला कारवाईपासून दिलेले संरक्षण कायम राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:29 am

Web Title: kangana sues in high court over treason charges abn 97
Next Stories
1 ‘पावरी हो रही है’ स्टाईलमध्ये रितेशने शेअर केला व्हिडीओ, पाहा व्हिडीओ
2 ‘या’ कारणामुळे शर्मिला यांनी अजूनही पाहिले नाही सैफ-करीनाच्या दुसऱ्या बाळाला
3 ऑस्करच्या यादीत आणखी एक भारतीय सिनेमा; सूर्याच्या ‘सोहराई पोटरू’ची निवड
Just Now!
X