मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामधून खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या बार आणि रेस्टॉरंट्समधून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण तापलेलं असतानाच यात अभिनेत्री कंगना रणौतने उडी घेतली आहे.

कायम वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनाने महाराष्ट्रातील राजकारणावर आणि पोलिसांवर तोंडसुख घेतलं आहे. अनेक राजकीय घडामोडींवर कंगना वादग्रस्त वक्तव्य करत असते. यावेळी कंगनाने महाराष्ट्रातील व्यवस्थेवर निशाणा साधला आहे.

नुकताच कंगनाने गेल्या वर्षातील राष्ट्रवादी कॉग्रेसचं एक ट्विट शेअर करत पोस्ट लिहली आहे. दिग्दर्शक अभिनव सिन्हा, सुधीर मिर्शा आणि हंसल मेहता यांनी शरद पवारांची भेट घेऊन देशातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली होती. यासंदर्भातील ट्विट राष्ट्रवादी कॉग्रेसने 25 जानेवारी 2020 ला पोस्ट केलं होतं. हे ट्विट कंगनाने रीट्विट केलं आहे. यात तिने म्हंटलंय, ” आमचं राजकारण ते राजकारण आणि तुमचं राजकराण ते राजकारण नाही हा. मला कायम भाजप अभिनेत्री म्हंटलं जातं. सिनेसृष्टीतील दोन सोहळे वगळता मी तर माझ्या पूर्ण आयुष्यात मोदींना भेटले देखील नाही. या फोटोमुळे हे कलाकार किमान सोनिया नौटंकी कंपनीचे वाटतायत ,नाही?” असं ट्विट कंगनाने केलं आहे.

हे ट्विट करण्याच्या काही तास आधी कंगनाने आणखी काही ट्विट केले आहेत. यात तिने टाइम्स नाउची एक बातमी ट्विट केलीय. परबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची ही बातमी आहे. या ट्विटमध्ये कंगनाने लिहलंय,”जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या भ्रष्ट आणि गैर कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं तेव्हा मला शिव्या आणि धमक्या देण्यात आल्या. माझ्यावर टीका करण्यात आली. मी विरोध केला तर माझ्यासाठी प्रिय असणाऱ्या माझ्या शहराबद्दल माझ्याच निष्ठेवर बोट ठेवण्यात आलं. तेव्हा पण मी शांत राहिले. जेव्हा त्यांनी माझं घर बेकायदेशीरपणे पाडलं तेव्हा अनेकांनी आनंद साजरा केला.”
यासोबतच तिने एका ट्विटमधून मी हरामखोर नाही तर देशभक्त आहे असं म्हंटलंय. “येत्या काळात त्यांचं पितळ उघड पडेल. आज मी खंबीर उभी आहे. त्यामुळे हे सिद्ध होतंय कि माझ्या नसांमधून वाहणाऱ्या राजपूत रक्तात माझ्या देशाबद्दल खरं प्रेम आणि निष्ठा आहे. मी हरामखोर नाही खरी देश भक्त आहे.” असं कंगनाने ट्विटमध्ये म्हंटलं आहे. महावसुली आघाडी म्हणत तिने सरकारवर टीका केलीय.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने बॉलिवूडसोबतच मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप केले होते. यावेळी तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. यावेळी ठाकरे सरकार आणि कंगना यांच्यात शाब्दिक चकमक रंगली होती. त्यामुळे पुन्हा एकदा कंगनाने संधी साधत महाराष्ट्र सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे.