कंगना राणावत आणि वाद हे समीकरण झाले आहे. अर्थात नेहमीच ती चुकीचे बोलते असे नाही. कधी कधी तिने मांडलेले मुद्दे इंडस्ट्रीलाच नाही तर प्रेक्षकांनाही विचार करायला लावणारे असतात. ‘जजमेंटल है क्या’ प्रदर्शित झाल्यानंतर कंगना शांत झाली आहे, असे वाटत असतानाच तिचे आणखी एक विधान नव्याने चर्चेत आले आहे. या वेळी हा वार कळत नकळत अभिनेता अक्षय कुमारवर झाला असला तरी तिचे खरे लक्ष्य हे आजच्या अभिनेत्री हेच आहे. सध्या इंडस्ट्रीत पुरुष-स्त्री कलाकारांच्या मानधनामध्ये केला जाणारा फरक हा चर्चेचा मुद्दा आहे. मात्र आताच्या अभिनेत्रींनी आम्हाला पुरुष कलाकारांपेक्षा कमी मानधन मिळते, अशी भूमिकाच घेता कामा नये. मी इतक्या मानधनासाठी लायक आहे आणि ते मला मिळालेच पाहिजे, हा पवित्रा हवा. नाही तर सध्या स्त्रीप्रधान चित्रपट काढण्यासाठीही मोठय़ा कलाकाराची गरज लागते, असे सांगत तिने अक्षयकुमार आणि ‘मिशन मंगल’वरही निशाणा साधला.

‘मिशन मंगल’सारखा नायिकाप्रधान चित्रपट काढायलाही आपल्याला एका मोठय़ा पुरुष कलाकाराची गरज भासते, कारण त्यालाच ऐंशी टक्के जनता पाहायला येते. इतक्या सगळ्या अभिनेत्री एकत्र येऊन महिला सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण यांसारख्या मुद्दय़ांवर का काम करत नाहीत? असा सवाल कंगनाने केला आहे. तिच्या मते मानधन असो वा कुठलीही समस्या त्यात स्त्री-पुरुष म्हणून फरक केला जातो, अशी नुसती ओरड करण्यात काहीच अर्थ नाही. उलट, त्यामुळे आपण आपलेच नाही तर इतर मुलींच्याही मनात हे ठसवतो आहोत, की आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी स्त्री-पुरुष भेदभाव केला जातो. त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे काहीच मिळत नाही. हा विचार चुकीचा असल्याचे कंगना म्हणते. पुरुष कलाकारांना सध्या जे मानधन दिले जाते ते त्यांच्या अनुभवावर, लोकांची गर्दी खेचून आणण्यावर, त्यांनी किती वर्ष आणि कसं काम केलं आहे, त्यावर आधारित असते. आता अभिनेत्रींनीही स्वत:ला अशा सक्षम पद्धतीने घडवलं पाहिजे, की जिथे फक्त तुमच्या अनुभवाचा, तुमच्या कामाचा विचार केला गेला पाहिजे. इतर कोणाला किती मानधन मिळते आणि मला त्याच्यापेक्षा कमी का मिळते, अशी विधाने करण्यापेक्षा माझं काम या योग्यतेचं आहे आणि त्यानुसारच मला मानधन मिळालं पाहिजे, असं ठणकावून सांगता आलं पाहिजे, अशी भूमिका कंगनाने मांडली आहे.

हा बदल घडून येण्यासाठी वेळ लागेल आणि त्यासाठी प्रयत्नही करावे लागतील, असे तिचे म्हणणे आहे. त्यासाठी सगळ्या अभिनेत्रींनी मिळून मुलींच्या शिक्षणासारख्या समस्यांवर काम केलं पाहिजे. कदाचित आज आपण जे प्रयत्न करतो आहोत, त्याचं फळ आपल्या पिढीला मिळणार नाही; पण पुढच्या पिढीतील स्त्रियांमध्ये यामुळे नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल, असेही कंगनाने स्पष्ट केले. कंगनाचा हा मुद्दा खरं तर कलाकारांनीच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील मुलामुलींना विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे कंगनाची बडबड नेहमीच निर्थक नसते, कधी तरी त्यातून धारदार विचार बाहेर पडतात हेही तितकंच खरं!