अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावरून तिचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिलीय. ८ मे ला कंगनाला करोनाची लागण झाली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कंगनाने तिचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज एक इन्स्टास्टोरी शेअर करत कंगनाने करोनातून ती बरी झाल्याची माहिती दिली आहे.

या पोस्टमध्ये कंगनाने तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्य़ाचे आभार मानले. पुढे ती म्हणाली, ” मला इथे खूप काही सांगायचं होतं की मी करोनावर कशी मात केली. मात्र मला कोव्हिड फॅन क्लबला दुखावू नको असं सांगण्यात आलंय. हो इथे असे अनेक लोक आहेत जे व्हायरलबद्दल काही बोललं तर दुखावले जातात. असो तुमचं प्रेम आणि आशिर्वादासाठी आभारी आहे.” असं म्हणत कंगनाने पुन्हा काही नेटकऱ्यांवर निशाणा साधला आहे. एकंदर कंगनाला तिने करोनावर मात कशी केली हे सांगायची इच्छा होती. मात्र नेटकऱ्यांच्या टीकेमुळे तिने तसं केलं नाही.

असं असलं तरी कंगनाला मात्र तिच्या भावना व्यक्त करण्याचा मोह आवरलेला नाही. पोस्ट शेअर केल्यानंतर काही तासातच कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत करोनावर मात करण्यासाठीच टिप्स सांगितल्या आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला ती म्हणाली, “मी मागच्यावेळी जेव्हा या व्हायरलबद्दल म्हणाले तेव्हा अनेकांना वाईट वाटलं. इथे अभिव्यक्ती स्वातंत्रचं नाही. असं वाटतं काही नकारात्मक लोक सकारात्मक लोकांवर त्यांची विचारसणी लादत आहेत. मात्र माझी बहिण म्हणाली इथे असे अनेक लोकं आहेत ज्यांच्या मनात आलं तर तुला श्वासही घेऊ देणार नाहित. म्हणून मी व्हिडीओ शेअर करतेय.” असं कंगना म्हणाली.

या व्हिडीओत करोनावर मात करण्यासाठी काय करायला हवं हे कंगनाने सांगितलं आहे. ती म्हणाली, “सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला स्वत:वर लक्ष द्यायचंय. इतरांना या व्हायरलची लागण होणार नाही याची काळजी घ्यायचीय. ” हेच सांगत असताना कंगनाने दिवसातून दोन तीन वेळा वाफ घेणं आणि काढे पिणं गरजेचं असल्याचं म्हंटलंय.

वाचा: “आणि माझ्याबद्दल काही म्हणाल तर नागडं करेन”; इस्त्रायल मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांवर कंगना भडकली

यासोबतच या काळात आपण काही योगासनं केली. मानसिक संतुलन राखण्यासाठी वाचन केलं. हनुमान चालिसा आणि गायत्री मंत्रांचं ऐकले असं कंगानाने सांगितलं आहे. मात्र कंगनाच्या या टिप्सनंतर ही आता ती पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.