बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या फाटक्या जिन्सवरील वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. आता कंगनाने ही उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने केलेल ट्वीट सध्या चर्चेत आहे. कंगनाने तिचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. यात कंगना स्टायलिस्ट दिसत असून तिची स्टाईल सगळ्यात चांगली का आहे हे कंगनाने सांगितले आहे. “जर तुम्हाला फाटलेली जीन्स परिधान करायची असेल, तर ती तुम्हाला या फोटोमध्ये जसे दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्ही कूल दिसायला पाहिजे, भिकारी असल्यासारखे नाही” या आशयाचे ट्वीट करत कंगनाने तीरथ सिंह रावत यांच्या वक्यव्यावर स्वत:चे मत मांडले आहे.

काय म्हणाले होते तीरथ सिंह रावत?

“एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. लोकांना भेटते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं,” असंही रावत म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल,” असं विधान रावत यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर सगळ्यात आधी विरोध हा बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने केला होता. तिने स्वत:चा रिप्ड जीन्समधला फोटो शेअर करत याला विरोध दर्शवला होता.