‘बेबी डॉल’, ‘चिट्टीया कलाइया’ या सारख्या गाण्यांमुळे तरुणाईमध्ये लोपकप्रिय असलेल्या कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. कनिकाच्या चारही टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे सध्या तिच्यावर लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  सुरुवातीला उपचार करुन घेताना अनेक नाटकं करणारी कनिका सध्या भावूक झाली असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

कनिकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने घरातल्यांची आठवण येत असून मला लवकरात लवकरच घरी जायचंय असं म्हटलं आहे. वेळेचा सदुपयोग कसा करावा हे आयुष्य शिकवतं. तर  वेळ आपल्याला आयुष्याची किंमत करायला शिकवतं, अशी पोस्ट कनिकाने शेअर केली आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘झोपायला जायचं आहे. तुम्ही मला दिलेल्या प्रेमामुळे आणि आशिर्वादामुळे माझी प्रकृती ठीक आहे. माझी मनापासून काळजी केल्यामुळे धन्यवाद. आता मला बरं वाटत असल्यामुळे मी आयसीयूमध्ये नाही. आशा करते की यापुढीच चाचणी निगेटीव्ह येईल. या काळात मला माझ्या घरच्यांची खूप आठवण येतेय. मला माझ्या घरी जायचंय. मुलांना भेटायलं आहे’, असं कनिकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, गायिका कनिका कपूरची तब्बल चार वेळा करोना विषाणूची चाचणी करण्यात आली. चौथ्यांदाही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  सध्या तिच्यावर लखनऊ येथील संजय गांधी पीजीआयएमएस या रुग्णालयात उपचार असून मध्यंतरी तिने रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली होती. मात्र आम्ही रुग्णांना सर्वोत्तम सेवा पुरवत असल्याचं रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.