गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड गायिका कनिका कपूर चर्चेत आहे. या चर्चा ती लंडनहून आल्यावर तिला करोना व्हायरसची लागण झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. २० मार्च रोजी कनिकाची पहिली करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर ३१ मार्च रोजी पाचवी करोना चाचणी करण्यात आली. ती देखील पॉझिटीव्ह आल्याने कनिकाच्या चर्चांना उधाण आले. पण या ११ दिवसांमध्ये कनिकासोबत नेमके काय झाले आहे याचा खुलासा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

इंडिया टूडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कनिकाच्या कुटुंबीयांनी कनिकासोबत नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे. ९ मार्च रोजी कनिका लंडनहून भारतात परतली. त्यावेळी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी करण्यात येत नव्हती. त्यामुळे ती घरी परतली. दुसऱ्या दिवशी होळी होती. कनिका कुटुंबीयांना भेटण्यासाठी लखनऊला येणार होती. पण प्रवास करुन दमल्याने तिने ११ मार्च रोजी लखनऊला जाण्याचे ठरवले.

कानपूरमध्ये कनिका तिच्या कुटुंबीयांना भेटली. त्यानंतर तिने एका पार्टिला हजेरी लावली. त्यावेळी करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती तिला नव्हती. सवयीप्रमाणे या पार्टीमध्ये देखील कनिका कोणाच्या जास्त जवळ गेली नाही. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या कोणालाही करोनाचा संसर्ग झाला नसल्याचे समोर आले.

कनिकाला तिचा मित्र भेटायला येणार असल्यामुळे तिने लखनऊमधील ताज हॉटेलमध्ये एक रुम बुक केली होती. मात्र मित्राला भेटल्यानंतर ती आपल्या लखनऊच्या घरी परतली. त्यानंतर कनिकाची तब्बेत बिघडली. १७ मार्चला रात्री तिला अचानक ताप आला. तिने त्यावर औषधे घेतली आणि घरातील इतर कुटुंबीयांना ताप येऊ नये म्हणून तिने स्वत:चे विलगीकरण करुन घेतले. तिने १७ मार्च आणि १८ मार्च रोजी स्वत:चे विलगिकरण करुन घेतले होते.

कनिकाला करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. तरीही तिने याबाबत डॉक्टरांना माहिती दिली. १९ मार्च रोजी डॉक्टरांनी कनिकाची करोना चाचणी केली. दुसरी दिवशी सकाळी म्हणजेच २० मार्च रोजी तिचे रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कनिकानाला लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला रुग्णालयाचे कपडे घालण्यास सांगण्यात आले. पण कपडे बदलण्यास तिला कोणती ही खोली न देता तेथील पडद्याच्या मागे बदलण्यास सांगितले. त्यानंतर तिने तेथे अस्वच्छता पाहून स्टाफला स्वच्छ करण्यास सांगितले. तिच्या या वागण्यावरुन सोशल मीडियावर ती डॉक्टरांसोबत गैरवर्तन करत असल्याचे म्हटले जात होते. पण आता तिच्या कुटुंबीयांनी नेमके काय झाले याचा खुलासा केला.

कनिकावर सध्या उपचार सुरु आहेत. ‘कनिकाची नवीन टेस्ट केल्यानंतर तिच्यात करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीयेत. तिची प्रकृती सध्या स्थिर आणि उत्तम आहे. तसेच तिच्या आहारातही कोणताच बदल झालेला नाही. तिचे खाणेपिणे दैनंदिन सवयीप्रमाणेच सुरु आहे. इतकच नाही तर तिची तब्येत बिघडल्याची माहिती सर्वत्र पसरली होती. मात्र हे सारे खोटे आहे. तिची प्रकृती स्थिर आणि उत्तम आहे’, असे रुग्णालयाचे संचालक डॉ. आर.के. धीमान यांनी सांगितले आहे.