‘बाहुबली २’ सिनेमा प्रदर्शित व्हायला आता काहीच दिवस बाकी असताना, बाहुबलीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हा सिनेमा कदाचित कन्नड प्रांतात दाखवण्यात येणार नाही. काही कन्नड संघटनांनी बाहुबली सिनेमाला कर्नाटकात प्रदर्शित होऊ न देण्याचा निश्चय केला आहे. त्यांच्या या विरोधाचे खरे कारण कटप्पाची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सत्यराज आहे.

‘सत्यराजने कावेरी पाणी प्रकरणात सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. सत्यराजने कर्नाटक आणि इथे राहणाऱ्या नागरिकांविरोधात तर्कहीन विधानं केली आहेत,’ असा आरोप कन्नड संघटनेचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता वतल नागराजने केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नागराज म्हणाला की, ‘आम्ही कर्नाटकमधील एकाही चित्रपटगृहात हा सिनेमा लावू देणार नाही. आम्ही सिनेमाच्या विरोधात नाही तर कट्टपा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता सत्यराजच्या विरोधात आहोत.’

पण असे असले तरी, जर सत्यराजने कर्नाटकमधील जनतेची माफी मागितली तर कर्नाटकमध्ये ‘बाहुबली २’ सिनेमा प्रदर्शित केला जाईल. आता सत्यराज यावर काय निर्णय घेणार हे तर येणारा काळच ठरवेल. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ सिनेमा तब्बल ६५०० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाकडेच सध्या सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात. बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागाने ६०० कोटींची कमाई केली होती. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या या सिनेमाच्या नावावर अनेक विक्रमही आहेत. अनुष्का शेट्टी, प्रभास, सत्यराज, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा सिनेमा येत्या २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.