नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपणच जिंकणार असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. मात्र ही निवडणूक त्यांच्यासाठी इतकी सोपी नसेल. कारण निवडणूकीच्या रिंगणात आता अमेरिकेतील प्रसिद्ध गायक, रॅपर कान्ये वेस्ट यांनी उडी घेतली आहे. दक्षिण कॅरोलिनामधून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी दिलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कडाडून टीका केली. शिवाय वर्णद्वेष, गर्भपात आणि चाईल्ड पॉर्नोग्राफी या मुद्यांवर बोलताना त्यांना रडू कोसळलं.

कान्ये वेस्ट यांनी पहिल्याच रॅलीत दमदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी वर्णद्वेष आणि गर्भपात या बद्दलचे काही वैयक्तीक अनुभव सांगितले. वडिलांनी त्यांच्या आईला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केली होती. परंतु आईमुळे त्यांचा जीव वाचला. हा अनुभव सांगताना त्यांना रडू कोसळलं. शिवाय त्यांनी वर्णद्वेष, चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय यावरही कडाडून टीका केली. अमेरिकेत सध्या कान्ये वेस्ट यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा आहे.

कान्ये वेस्ट हे, अमेरिकेत प्रचंड प्रसिध्द आहेत. त्यांचे रॅप साँग अमेरिकन लोकांना प्रचंड भावतात. या लोकप्रियतेच्या बळावर आता ते राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. अलिकडेच त्यांनी ट्विट करुन याबद्लची माहिती दिली होती. यावर त्यांची पत्नी अभिनेत्री किम कार्दशियन हिनेही अमेरिकेचा झेंडा दाखवून त्यांचं समर्थन केलं होतं. कान्ये वेस्ट यांना टेस्ला या बढ्या कंपनीचे धनाढ्य मालक एलॉन मस्क यांनीही पाठिंबा दिला आहे. कान्येच्या टि्वटला उत्तर देत मस्क यांनी म्हटलं की, “तुला माझा पूर्ण पाठिंबा आहे.”