कपिल शर्मा आणि त्याच्याशी संबंधित वादविवाद यावर आतापर्यंत बरीच चर्चा झाली. सहकलाकार सुनील ग्रोवरशी झालेलं भांडण, कपिलचं सेटवर उशिरा पोहोचणं, कलाकारांना ताटकळत ठेवणं या सर्व गोष्टींनंतर कपिलचं व्यावसायिक आणि खासगी आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. आगामी ‘फिरंगी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात कपिलने या सर्व विषयांवर मोकळेपणाने भाष्य केलं. वादामुळे झालेल्या मानसिक त्रासानंतर आत्महत्या करण्याचा विचारही त्याने केला होता.

‘आपल्यासंदर्भात होत असलेल्या चर्चा, काही गोष्टींना उगाच दिलेलं महत्त्व यांमुळे मला मानसिक त्रास होऊ लागला. त्यातूनच नैराश्य येऊन सतत दारू पिऊ लागलो. हे सर्व असह्य झाल्यानंतर एक असाही प्रसंग आला की मला आत्महत्या करावीशी वाटली. जेव्हा माझ्या शोचा टीआरपी घसरू लागला, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली,’ असं तो म्हणाला. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी जवळच्या मित्रांनीही खूप प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. ‘मिड डे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटलं की, ‘माझ्या एका जिवलग मित्राने काही दिवसांसाठी मला त्याच्या समुद्रासमोरील घरी राहण्याचा सल्ला दिलेला. चांगले दृश्य पाहून माझ्यात सकारात्मकता येईल असं त्याला वाटलं. त्याच्या घरातील बाल्कनीतून मी जेव्हा समुद्राकडे पाहायचो, तेव्हा मला त्यात उडी मारून आत्महत्या करावीशी वाटत असे. संपूर्ण जग माझ्याविरोधात आहे, असंच मला जाणवू लागलं होतं.’

वाचा : कामासाठी मलाही तडजोड करण्यास सांगितलं गेलं- इरफान खान

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिलच्या स्वभावात नैराश्यामुळे खूप बदल होऊ लागलेला. ज्याचा फटका ‘द कपिल शर्मा शो’ला बसला. तो पुढे म्हणाला की, ‘माझ्या परिस्थितीबद्दल मी कोणाशीही मनमोकळेपणाने बोलूही शकत नव्हतो. माझ्याच शोच्या मंचावर जाऊन पूर्वीप्रमाणे लोकांशी संवाद साधण्याचं धाडस होत नव्हतं. आत्मविश्वास गमावल्याने मी काम करणं टाळत होतो. माझ्याच कार्यालयात मी स्वत:ला कोंडून घेतलं आणि कोणाशीच भेटत नव्हतो. काही सेलिब्रिटी शूट न करताच परतले होते. याचाच परिणाम टीआरपीवर झाला आणि अखेर शो बंद करण्याची वेळ आली.’

कपिलच्या आयुष्यातील हा सर्वांत कठीण काळ होता, असं तो मानतो. नैराश्य आणि व्यसनाधीनता यावर मात करून तो पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागला आहे. सध्या तो ‘फिरंगी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. येत्या २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.