‘द कपिल शर्मा’ शोमधून कपिलनं छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन कपिल भेटीला आला. मध्यंतरीच्या काळात सहकलाकारांसोबत झालेले वाद, त्यातून आलेलं नैराश्य आणि घसरता टीआरपी यामुळे कपिलचा कॉमेडी शो बंद झाला. कपिलचे ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ हे दोन्ही शो टीआरपीच्या यादी अव्वल होते. या शोमध्ये बॉलिवूडमधले अनेक दिग्गज कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यायचे. मात्र कपिल या सर्वांना सेटवर वाट पहायला लावायचा अशाही चर्चा होत्या.

पण आता मात्र कपिल सेटवर वेळेत येतो. विशेष म्हणजे अनेकदा तो पाहुण्यांच्याही आधी हजर असतो असं अभिनेत्री जुही चावला एका मुलाखतीत म्हणाली. ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जुही ‘द कपिल शर्मा शो’ च्या सेटवर आली होती. अनेकदा रात्री अकरा किंवा पहाटे तीन वाजेपर्यंत कपिलच्या शोचं चित्रीकरण चालायचं यावेळी मात्र चित्रीकरण सांयकाळी सात वाजता सुरू झालं.

जुही सेटवर पोहोचली तेव्हा एरव्ही लेट येणारा कपिल वेळेच्या आधीच सेटवर पोहोचला होता. कपिलच्या उशीरा येण्याच्या सवयीबद्दल माहिती असणाऱ्या जुहीला सेटवर वेळेत आलेल्या कपिलला पाहून आश्चर्य वाटलं. तिनं सेटवर चौकशी केली असता कपिल रोज दहाच्या आत घरी परततो अशी माहिती तिला मिळाली.

हा पत्नी गिन्नीचा प्रभाव असेल असं म्हणतं कपिलच्या बदललेल्या सवयीबद्दल जुहीनं मिश्किल प्रतिक्रिया दिली. कपिल डिसेंबर महिन्यात प्रेयसी गिन्नी छत्रतसोबत विवाहबंधनात अडकला. तेव्हापासून कपिलच्या आयुष्यात अनेक बदल झाले. विशेष म्हणजे तो घरी वेळेत जाऊन लागला हा बदल चांगला आहे असं म्हणत जुहीनं कौतुक केलं आहे.