सुरतमधील कपिल शर्माचा लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी शनिवारच्या रात्री प्रेक्षकांनी खूप मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. कपिल शर्माचा लाईव्ह शो पाहण्यासाठी ५,००० प्रेक्षक येण्याचे आपेक्षित होते, परंतु प्रत्याक्षात २५,००० लोकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती लावली. या गर्दीत एक लहान मुलगी आपल्या आई-वडिलांपासून दूरावली. कपिल शर्माने या रडणाऱ्या मुलीला पाहून तिला उचलून घेतले. याविषयी बोलताना विनोदवीर कपिल म्हणाला, ती खूप लहान आणि नाजूक होती. ती बोलूसुद्धा शकत नव्हती. ती घाबरलेली मुलगी एकसारखी रडत होती. मला तिची खूप दया आली. लहान मुलांना रडताना पाहाणे हा खूप हृदयद्रावक अनुभव असतो. त्या लहान मुलीने मला माझ्या पुतणीची आठवण करून दिली. त्या मुलीची ती अवस्था पाहून मला खूप वेदना झाल्या. कपिल शर्माने त्या मुलीला मंचावर नेऊन तिच्या पालकांना बोलावले. मुलगी हरवल्याने हवालदिल झालेले तिचे वडील धावतच मंचावर आले. कपिल शर्माने त्यांना चांगले खडे बोल सुनावले. प्रेक्षकांसमोर मी त्या लहान मुलीच्या वडिलांची चांगली खरडपट्टी काढली. त्यांची कान उघडणी करणे गरजेचे होते. जबाबदार पिता होणे हा चांगला नागरिक होण्याचा पाया आहे. आपल्या जबाबदाऱ्या गांभिऱ्याने घेण्यास शिकणे गरजेचे असल्याचे कपिल म्हणाला. सुरतच्या घटनेने डोळे उघडलेला कपिल म्हणाला, त्यांनी ५,००० च्या आसपास लोक येणार असल्याचे सांगितले होते. पण, प्रत्यक्षात २५,००० च्या वर लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. गुजरातच्या सर्व भागातून लोक आले होते. हल्ली मी खूप व्यस्त असल्याने पूर्वीइतके लाईव्ह शो करत नाही. लोकांना सुरतमधील माझ्या लाईव्ह शोबाबत समजल्यावर गुजरातच्या सर्व भागातून बस भरभरून लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. मला बघायला लोक दुरूनदुरून आले होते. मी खूप भारावून गेलो.